टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग माही १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, परंतु तो आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. तो अजूनही चेन्नई संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. धोनी हा जगातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. टी२० विश्वचषक जिंकणारा महेंदसिंग धोनी हा पहिला कर्णधार आहे. भारताला त्याने क्रिकेटमधील सर्व प्रकारात एका उंचीवर नेऊन ठेवले. आयसीसीचे तीन महत्वाचे चषक त्याने जिंकून दिले आहेत. फलंदाजीला सर्वात खाली येत त्याने फिनिशरची भूमिका निभावली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता फिल्मी विश्वावर अधिराज्य गाजवण्याची तयारी केली आहे. त्याचा अद्याप हिरो बनण्याचा कोणताही विचार नसला तरी त्याने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. माहीने त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘धोनी एंटरटेनमेंट’ ठेवले आहे. लेट्स सिनेमाने रविवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्याने एक फोटो देखील शेअर केला ज्यामध्ये धोनी दिसत आहे आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव देखील आहे.
सूत्रांकडून अशी माहिती समोर येत आहे की, धोनी आता फिल्मी दुनियेत लवकरच पाऊल ठेवणार असून तो स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू करेन. रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की, धोनी साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयसोबत एक चित्रपट करणार आहे. एवढेच नाही तर धोनी या चित्रपटात कॅमिओ देखील करू शकतो अशी अपेक्षा आहे. धोनीने स्वतः साऊथ सुपरस्टार विजयला फोन करून हा चित्रपट करण्यास सांगितले आहे.
तीन भाषांमध्ये चित्रपट बनणार
महेंद्रसिंग धोनीच्या प्रोडक्शन हाऊसच्या पोस्टरमध्ये असे समजते आहे की, माही तीन भाषांमध्ये आपले चित्रपट बनवणार असल्याची आहे. यात भाषा तमिळ, तेलगू आणि मल्याळम आहेत. तसे, धोनी २००८ पासून आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्यामुळे धोनी दक्षिणेतही खूप प्रसिद्ध आहे. माहीला थाला नावानेही संबोधले जाते.