‘‘पद्मभूषण सन्मान हा माझ्यासाठी स्वर्गीय सुखाचा आनंद असला तरी लंडन येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी महेश भूपतीच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे ती स्पर्धा माझ्यासाठी खूप क्लेषदायक ठरली,’’ असा बिनतोड फटकाच टेनिसपटू लिएण्डर पेस याने भूपतीविरोधात खेळला आहे.
पेसने १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविले होते. भारताच्या टेनिस इतिहासातील ते पहिलेच ऑलिम्पिक पदक आहे. त्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये पेसने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. लंडनमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या निवड चाचणीप्रसंगी रोहन बोपण्णाने आपण फक्त भूपतीबरोबरच खेळणार असल्याचा आग्रह धरला होता. पेसला संधी देऊ नये अशी मागणी त्यावेळी भारताच्या अन्य अव्वल खेळाडूंनी केली होती. भूपती हाच त्यांचा बोलविता धनी होता. मात्र अखिल भारतीय टेनिस महासंघाने पेसला एकेरीत संधी दिली तसेच दुहेरीत विष्णू वर्धनबरोबर व मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या साथीने खेळण्यासाठी त्याची निवड केली गेली.
‘‘भूपतीच्या पाठिंब्यावर आमच्या अन्य खेळाडूंनी केलेल्या तमाशामुळेच माझ्या सरावावर मी अपेक्षेइतकी एकाग्रता ठेवू शकलो नाही. हा जर गोंधळ झाला नसता तर कदाचित मी पुन्हा भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले असते,’’ असे पेसने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘भूपतीच्या साथीने पुन्हा खेळणार नाही. लंडन येथील विदारक अनुभव माझ्यासाठी अजूनही क्लेषकारक आहे. या कटू आठवणी पुसण्यासाठीच मी रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करीन. माझ्यासाठी ती सातवी ऑलिम्पिक स्पर्धा असेल. त्या स्पर्धेसाठी जेमतेम दोन वर्षेच बाकी आहेत. तोपर्यंत शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्याची मला खात्री आहे. पुरुष दुहेरीत मी पहिल्या दहा मानांकनांत आहे व सहा महिन्यांपूर्वीच मी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. रिओ ऑलिम्पिकच्या वेळी मी ४२ वर्षांचा असेन व तोपर्यंत तेजोवलय टिकविण्याची मला आशा आहे.’’
डेव्हिस चषकाविषयी पेस म्हणाला, ‘‘सर्बियाविरुद्ध भारतात होणाऱ्या डेव्हिस चषक लढतीत सहभागी होण्याची माझी तयारी आहे. मी केव्हाही माझ्या देशाकरिता लढण्यासाठी तयार असतो, अर्थात खेळाडू म्हणूनच भाग घेण्यासाठी तयार आहे. त्याकरिता अखिल भारतीय टेनिस महासंघाकडून विचारणा होण्याची आवश्यकता आहे. माझ्या उपस्थितीमुळे भारतीय संघाची ताकद वाढणार असेल तर  न खेळणारा कर्णधार म्हणून जबाबदारीही आनंदाने सांभाळेन. ’’
‘‘पद्म पुरस्कार वितरण समारंभासाठी माझी कन्या आयनाला उपस्थित राहता आले नाही, याचे दु:ख मला होत आहे. ती आली असती तर, हा कार्यक्रम माझ्यासाठी आणखीन  संस्मरणीय ठरला असता,’’ असे तो म्हणाला.