सार्थ प्रतिष्ठान आणि वंदे मातरम् क्रीडा मंडळ यांच्यातर्फे आयोजित पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या मिहद्रा संघाने मोक्याच्या क्षणी शानदार खेळ करत जेतेपदावर नाव कोरले. या हंगामातील महिंद्राचे हे तिसरे जेतेपद आहे.
चुरशीच्या अंतिम सामन्यात महिंद्राने भारत पेट्रोलियमचे कडवे आव्हान ७-६ असे परतावून लावले. शैलेश सावंतने सचिन शिंगाडेला टिपत भारत पेट्रोलियमला पहिला गुण मिळवून दिला. महिंद्राच्या काशिलिंगने पुढच्याच चढाईत आशिष म्हात्रेला टिपत संघाला बरोबरी साधून दिली. भारत पेट्रोलियमच्या नीलेश शिंदेने साखळी मारून काशिलिंगची पकड केली. या क्षणापासून पेट्रोलियमने आघाडी घेतली ती सामना संपायला ४ मिनिटे बाकी असेपर्यंत.
शेवटच्या काही मिनिटांमध्ये महिंद्राच्या अमोल वडारने ही कोंडी फोडली. त्याने नीलेश मोरेला टिपत महिंद्राला ५-५ अशी बरोबरी मिळवून दिली. मात्र पेट्रोलियमच्या शैलेश सावंतने शेवटच्या मिनिटाला बोनस गुण घेत संघाला आघाडी मिळवून दिली.
महिंद्रातर्फे शेवटची चढाई भूषण कुलकर्णीने केली. त्यावेळी पेट्रोलियमचे ५ जण मैदानात होते. एखादा गुण मिळवला तरी बरोबरी होऊन संधी मिळण्याची शक्यता होती. त्याने या चढाईत नितीन मोरेला बाद केले. परंतु भूषणची पकड करण्याच्या नादात नितीन आणि शैलेश सावंत बाद झाले आणि महिंद्राने २ गुणांनी सनसनाटी विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघाच्या मिळून ६४ चढाया झाल्या. संपूर्ण सामन्यावर पेट्रोलियमचे वर्चस्व होते.
स्पर्धेत प्रथमच देण्यात आलेला सवरेत्कृष्ट प्रशिक्षकाचा मान भारत पेट्रोलियमच्या प्रताप शेट्टी यांना मिळाला. सवरेत्कृष्ट चढाईपटूचा मानकरी ठरला तो महिंद्राचा भूषण कुलकर्णी. भारत पेट्रोलियमच्या आशिष म्हात्रेला सवरेत्कृष्ट पकडपटू पुरस्काराने गौरविण्यात आले.

Story img Loader