वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा
यजमान महाराष्ट्राने दोन्ही गटात उपांत्य फेरीत स्थान मिळवीत वरिष्ठ गटाच्या ४६ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील पुरुष गटात वर्चस्व कायम राखले. पुरुष गटात कर्नाटक, गतविजेता रेल्वे व कोल्हापूर यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला तर महिलांमध्ये दिल्ली, केरळ, कर्नाटक यांनी उपांत्य फेरीकडे वाटचाल केली.
विद्या प्रतिष्ठान संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील पुरुष गटात रेल्वे संघाने केरळ संघाचे आव्हान १४-१२ असे एक डाव दोन गुणांनी परतविले. कोल्हापूरने चुरशीच्या लढतीत आंध्र प्रदेश संघावर १६-१५ अशी वीस सेकंद राखून मात केली. खेळाडूंमधील बाचाबाचीमुळे व्यत्यय निर्माण झालेल्या लढतीत कर्नाटकने पश्चिम बंगाल या तुल्यबळ संघाला मध्यंतराला ७-८ अशा पिछाडीवरून १६-१४ असे हरविले.
उपांत्य लढतीत कर्नाटकची रेल्वे संघाशी गाठ पडणार आहे. महाराष्ट्राची कोल्हापूरशी लढत होणार आहे. महाराष्ट्राने छत्तीसगड संघाला १३-८ असे एक डाव पाच गुणांनी असे हरविले. महिला गटात कर्नाटक संघाने १०-९ असा एक डाव एक गुणाने पराभव केला. महाराष्ट्राने सारिका काळे, प्रियंका येळे व कीर्ती चव्हाण यांच्या खेळाच्या जोरावर विदर्भ संघाचे आव्हान १०-८ असे एक डाव दोन गुणांनी पराभूत केले. केरळ संघाने पंजाबवर ११-९ अशी साडेचार मिनिटे राखून मात केली. दिल्लीने पश्चिम बंगालचा १४-१३ असा एक गडी व साडेचार मिनिटे राखून पराभव केला. स्पर्धेतील उपांत्य सामने बुधवारी सकाळी साडेसात वाजता होणार असून अंतिम सामने दुपारी साडेचार वाजता होतील. अंतिम सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीवरून दुपारी ४-३० ते ६-३० या वेळेत होणार आहे.

Story img Loader