‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार क्रीडापटू म्हणून हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना सर्वप्रथम मिळायला हवा होता, असे मत भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांनी व्यक्त केले.
‘‘ध्यानचंद हे भारतरत्न पुरस्कारासाठी सर्वात योग्य व्यक्ती होते. सचिन तेंडुलकरला हा पुरस्कार देण्यात आला हे एक प्रकारे चांगले झाले. कारण क्रीडापटूला या पुरस्काराचे दार त्यामुळे खुले झाले. परंतु या पुरस्काराचा सर्वप्रथम मान हा ध्यानचंद यांचा होता,’’ असे मिल्खा सिंग यांनी सांगितले.
१९६०मध्ये झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेत ४०० मीटर शर्यतीत मिल्खा सिंग यांना चौथा क्रमांक मिळाला होता. ८० वर्षीय मिल्खा सिंग यांनी सायना नेहवालच्या पद्मभूषण पुरस्काराबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘सायनाच्या कर्तृत्वाचा विचार करता, तो पुरस्कार तिला मिळायला हवा. परंतु तुम्ही स्वत:लाच पुरस्कार मिळण्यासाठी सांगता, तेव्हा ते चुकीचे ठरते!’’