नेमबाजी हा खेळ आता देशात तळागाळापर्यंत पोहोचला असला तरी उपजीविकेसाठी करीअर म्हणून या खेळावर विसंबून राहणे आव्हानात्मकच आहे. खेळाडूंनी या खेळाबरोबरच शैक्षणिक कारकीर्दही सुरू ठेवावी, असा सल्ला दिला आहे भारताचा ऑलिम्पिक नेमबाज समरेश जंग याने. शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ‘गन ऑफ ग्लोरी’ स्पर्धेत तो सहभागी झाला आहे. समरेशने बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने आजपर्यंत कारकीर्दीत राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सात सुवर्णपदके, तीन रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली आहे. अजूनही ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न त्याने बाळगले आहे. नेमबाजीच्या प्रगतीविषयी व त्याच्या वैयक्तिक कारकीर्दीविषयी त्याने मनमोकळेपणाने संवाद साधला-
ऑलिम्पिकमध्ये लागोपाठ तीन स्पर्धामध्ये भारताला पदके मिळाल्यामुळे नेमबाजीची लोकप्रियता वाढली आहे काय?
हो, निश्चितच. राजवर्धनसिंह राठोड, अभिनव िबद्रा, विजय कुमार व गगन नारंग यांच्या ऑलिम्पिक पदकांमुळे या खेळात अधिकाधिक खेळाडू सहभागी होऊ लागले आहेत. पुण्यातील अखिल भारतीय स्पर्धेत दीड-दोन हजार खेळाडूंनी भाग घेतला आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
या खेळात करीअर करणे शक्य आहे काय?
जरी या खेळात संख्यात्मक प्रतिसाद वाढत असला तरी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून संपूर्णपणे या खेळावर लक्ष केंद्रित करणे चुकीचे ठरेल. कारण आपल्या देशात फक्त पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंनाच भरपूर प्रायोजक व अव्वल दर्जाच्या सुविधा मिळत असतात. या खेळात थोडासा नशिबाचाही भाग असतो, त्यामुळे प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक वेळी पदकांचा मानकरी ठरेल असे सांगता येत नाही. युवा खेळाडूंनी शिक्षणाची जोड ठेवलीच पाहिजे.
नेमबाजीकडे पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला आहे काय?
हो, ऑलिम्पिक पदकांमुळे या खेळाकडे पाहण्याचा शासनाचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे. या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळविण्याची क्षमता व नैपुण्य आपल्या खेळाडूंमध्ये आहे याची जाणीव सर्वाना झाली आहे. पूर्वी या खेळासाठी साहित्य मिळणे खूप कठीण होते. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनाही त्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. आता शासनाने व आमच्या राष्ट्रीय महासंघानेही खेळाडूंसाठी साधन सामुग्री मिळविण्याबाबतच्या अडचणी दूर केल्या आहेत.
असे म्हटले जाते की एकवेळ गुन्हेगारांना बंदुकांसाठी झटपट परवाना मिळतो, मात्र खेळाडूंना परवाना मिळणे कठीण जाते याविषयी काय मत आहे?
शासनाने परवाना देताना संबंधित व्यक्तीची पाश्र्वभूमी माहीत करून घेतली पाहिजे. पूर्वी १८ वर्षे पूर्ण झाल्याखेरीज परवाना मिळत नसे. आता १२ वर्षांंखालील खेळाडूही या खेळात सहभागी होऊ लागले आहेत. प्रत्येक खेळाडू एखाद्या संघटनेचा किंवा क्लबचा सभासद असतो. त्या क्लब अथवा संघटनेची शिफारस असल्यास हा परवाना लगेच दिला पाहिजे. अजूनही विमानतळावर खेळाडूंना शस्त्रे आणताना खूप अडचणी येतात. विश्वविक्रमवीर सिदी पीटर्स याला येथे येताना या अडचणींना सामोरे जावे लागले होते. या अडचणी कशा लवकर दूर होतील याचा विचार संबंधित खात्याने केला पाहिजे.
या खेळाचा अपेक्षेइतका दर्जा उंचावला आहे काय?
या खेळात आपल्या खेळाडूंची प्रगती होत असली तरी अजूनही बराच पल्ला गाठावयाचा आहे. प्रामुख्याने देशाच्या अनेक ठिकाणी क्लब व अकादमी होण्याची आवश्यकता आहे. सध्या आपल्या देशात अव्वल दर्जाच्या तीनचारच अकादमी आहेत. आंतरक्लब स्तरावर अधिकाधिक स्पर्धा आयोजित करण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रत्येक क्लबमध्ये पुरेशी साधन सामुग्री व चांगल्या दर्जाच्या प्रशिक्षकांची गरज आहे. २५ मीटर, ५० मीटर अशा मध्यम स्वरूपाच्या प्रशिक्षणासाठी अकादमी स्थापन केल्या पाहिजेत.
परदेशी प्रशिक्षकांमार्फत मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा कितपत फायदा होत आहे?
आपल्या देशात गेल्या दहा वर्षांमध्ये या खेळात जी काही प्रगती दिसून येत आहे, त्यामध्ये परदेशी प्रशिक्षकांचा महत्त्वाचा वाटा आहे. या खेळात अपेक्षेइतक्या ऑलिम्पिक दर्जाचे प्रशिक्षक नसल्यामुळे आपल्या खेळाडूंसाठी परदेशी प्रशिक्षक अनिवार्य आहे.
तुझे नजीकचे ध्येय काय आहे?
रिओ ऑलिम्पिकबाबत मी सध्या विचार करत नसलो तरी पुढचे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई क्रीडा स्पर्धाबरोबरच जागतिक नेमबाजी स्पर्धा पुढील वर्षी होणार आहे. ऑलिम्पिक पात्रता पार करण्यासाठी जागतिक स्पर्धेतील कामगिरी अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळेच मी जागतिक स्पर्धेवर अधिक लक्ष केंद्रित करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा