* गंभीर, युवराजला डच्चू; कार्तिकचे पुनरागमन
* आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघ जाहीर
* आयपीएलचा प्रभाव आणि आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी
इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेसाठी ‘मेकओव्हर’चे धोरण स्वीकारत संदीप पाटील आणि कंपनीने १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. याशिवाय आयपीएल हंगामातील कामगिरीचा भारतीय संघाच्या निवडीवर प्रभाव असल्याचे सहजपणे स्पष्ट होत आहे. सलामीवीर गौतम गंभीर आणि मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग या दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले आहे, तर सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने संघात स्थान मिळवले आहे. वेगवान गोलंदाज अशोक दिंडा आणि मुंबईचा फलंदाज अजिंक्य रहाणे यांनाही संघातून डच्चू देण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील भारतीय संघातून सहा जणांना वगळण्यात आले आहे.
कार्तिकसोबत, अष्टपैलू इरफान पठाण, वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि विनय कुमार यांनी भारतीय एकदिवसीय संघात पुनरागमन केले आहे. मुंबईतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट केंद्रात झालेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर सचिव संजय जगदाळे यांनी संघ जाहीर केला. २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघाची बांधणी केली जात असल्याचे या संघनिवडीतून अधोरेखित होत आहे.
सलामीसाठी धवनला पहिली पसंती; गंभीरऐवजी मुरली
संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने डावखुऱ्या गंभीरऐवजी सलामीच्या स्थानासाठी मुरली विजयला आश्चर्यकारक पसंती दिली. विजय सध्या धावांसाठी झगडत आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज या त्याच्या संघातूनही त्याला वगळण्यात आले आहे.
नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत शिखर धवनने १८७ धावांची धडाकेबाज खेळी साकारून सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. सलामीच्या स्थानासाठी पहिली पसंती निवड समितीने धवनलाच दिली आहे. निवड समितीने गंभीरचा गांभीर्याने विचार केलेला नाही. आयपीएलच्या हंगामातील ११ सामन्यांत त्याच्या खात्यावर तीन अर्धशतकांसह ३२० धावा जमा आहेत. भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग संभाव्य भारतीय संघातही स्थान मिळवू शकत नसताना गंभीरचीही संघातून हकालपट्टी करण्याचा निर्णय हा धक्कादायक मानला जात आहे. कार्तिक वेळप्रसंगी सलामीसाठीसुद्धा पर्याय उपलब्ध असेल.
मधल्या फळीतून युवराज संघाबाहेरच
मागील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा गाजविणारा आणि त्यानंतर कर्करोगाशी झुंज देऊन पुन्हा मैदानावर परतलेला अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला अनपेक्षितरीत्या वगळण्यात आले आहे. परंतु सध्या आयपीएलमध्ये हा डावखुरा फलंदाज धावांसाठी झगडतानाच आढळत आहे. पुणे वॉरियर्सकडून खेळणाऱ्या युवीला आठ सामन्यांत एकदाही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याने २२.२८च्या सरासरीने फक्त १५६ धावा केल्या आहेत. ३४ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. भारतीय संघाच्या मधल्या फळीची धुरा विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक यांच्यावर असेल.
फिरकी त्रिकुटामध्ये लेग-स्पिनर मिश्रा
भारताच्या फिरकीची मदार ऑफ-स्पिनर आर. अश्विन आणि डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांच्यावर असणार आहे. याशिवाय सध्या आयपीएल हंगामात आपल्या अष्टपैलुत्वाची चुणूक दाखविणाऱ्या अमित मिश्रानेही आपले स्थान टिकवले आहे.
इंग्लिश वातावरणासाठी वेगवान गोलंदाजांचे ‘पंचक’
इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजांना अनुकूल वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर निवड समितीने इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इरफान पठाण आणि विनय कुमार या पाच वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरलेल्या यादवने संघात पुनरागमन केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा विनय टिच्चून गोलंदाजी करीत आहे. विनय आणि पठाण या अष्टपैलू खेळाडूंकडून चांगल्या फलंदाजीचीही अपेक्षा करता येऊ शकते.
तिरंगी स्पध्रेसाठी संभाव्य खेळाडूंमध्ये गंभीर
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेनंतर वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेसाठी संभाव्य खेळाडूंची निवड करताना या १५ खेळाडूंच्या संख्येत आणखी सहा जणांची भर घातली आहे. यात गौतम गंभीर, मनोज तिवारी, प्रवीण कुमार, मोहम्मद शामी, अंबाती रायुडू आणि राहुल शर्मा यांचा समावेश आहे.
भारताचा संघ
सलामीवीर : मुरली विजय, शिखर धवन.
मधली फळी : विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक).
फिरकी गोलंदाज : आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा.
मध्यमगती गोलंदाज : इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, इरफान पठाण, विनय कुमार.