क्रीडा, सौजन्य –
‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने मिल्खा सिंह यांना आजच्या काळात घरोघरी नेऊन पोहोचवले. पण याच मिल्खा सिंह यांना मख्खन सिंह या त्यांच्या सहकाऱ्याने एकदा हरवले होते. त्यांची दखल कुठेच घेतली गेली नाही.
‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट नुकताच भारतात १२ जुलै २०१३ ला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाचे प्रोमोज अनेकदा पाहिले. बहुतांश टीव्ही चॅनेलनी त्याची दखल घेतली. दूरदर्शनच्या न्यूज चॅनेलवर मी मिल्खा सिंह यांची मुलाखत पाहिली. मिल्खा सिंह यांनी दोन वेळा ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले तर रोम, टोकियो, जकार्ता या आशियाई ‘धावस्पर्धां’मध्ये भारताची शान राखली. पाकिस्तानच्या स्पर्धेमध्ये मिल्खा सिंह यांनी बाजी मारली. ‘भाग मिल्खा भाग’ पाहताना त्यांच्या या यशाने रोमांच उभे राहतात तर त्यांनी घेतलेली मेहनत पाहून आपण नतमस्तक होतो.
मिल्खा सिंह यांच्यावरच्या हा चित्रपट पाहताना सतत आठवण येत होती, मिल्खा सिंह यांना हरवणाऱ्या मख्खन सिंहची. होय! मिल्खा सिंह यांना हरविणारा एक धावपटू तेव्हा होता आणि तो ‘नागपूर’चा होता हे विशेष. त्या धावपटूचे नाव होते, मख्खन सिंह. रोम, टोकियो, जकार्ता येथील एशियाई स्पर्धेमध्ये मिल्खासिंह प्रथम आले तर मख्खन दुसरे. ही ४०० मीटरची स्पर्धा होती. या ४०० मीटरच्या स्पर्धेमध्ये मिल्खा, मख्खन, दलजीत व जगदीश या टीमने सुवर्णपदक मिळवले होते. पाकिस्तानच्या स्पर्धेमध्ये मिल्खा प्रथम तर दुसरा मख्खन होते. पाकिस्तानचा धावपटू अब्दुल खलीफ हा तिसरा होता. मख्खन हे नेहमीच दुसऱ्या स्थानावर असत. काही सेकंदाच्या फरकाने ते दुसऱ्या स्थानावर जात.
इ.स. १९६४ च्या कलकत्ता येथील राष्ट्रीय दौड स्पर्धेत जगद्विख्यात मिल्खा सिंह यांना मख्खन सिंह यांनी  हरविले.. मिल्खा सिंह यांनी ४७.९ सेकंद ४०० मीटरच्या दौडीसाठी घेतले होते तर मख्खन सिंह यांनी ४७.५ सेकंद घेतले होते. त्यावेळी पत्रकारांनी मख्खन सिंह यांची दखल घेतली. मिल्खा सिंह आणि मख्खन सिंह हे दोघे दोस्त. त्यामुळे एकदा मिल्खा सिंह इ.स. १९७८ ला नॅशनल स्कूल हॉकीकरिता नागपूर येथे आले होते. नागपूरच्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे भेटीचे आमंत्रण नाकारून त्यांनी प्राधान्य दिले ते कामठी रोडवर डॉ. रामसिंह सदन, पंजाबी लाइन येथे एका छोटय़ाशा चाळीतील खोलीमध्ये राहणाऱ्या ते मख्खन सिंह यांना त्यांच्या घरी जाऊन भेटायला. पत्ता फारसा माहीत नसतानाही त्यांनी अथक परिश्रमांनी मक्खन यांचा पत्ता शोधून काढला. या चाळीमधील तिसऱ्या माळ्यावर मख्खन राहत होते. मिल्खा सिंग मख्खन सिंगना भेटले. मख्खनच्या परिवारासोबत त्यांनी एक तास घालविला. पत्नीची विचारपूस केली. मुलांचे लाड केले. तेव्हा मिल्खा सिंह मख्खन सिंहच्या मुलाला म्हणाले, ‘‘तेरा ही तो पिता है, जिसने मेनू (मुझे) हराया। उसां मैं किस तरां भुल्ला?’’ (मनोहर कहानियां, रणजीत मेश्राम, अनुवाद- प्रदीप शालीग्राम मेश्राम, फरवरी १९८३, पृ.क्र. ७३) मख्खन सिंह यांचे घर भाडय़ाचे होते. त्यावेळी त्याचे घरभाडे ११० रुपये होते. त्यांची परिस्थिती पाहून मिल्खा दुखी झाले.
मख्खन सिंह यांना राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते इ.स. १९६६ ला अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले गेले. ते अनेक वर्षांपर्यंत लष्करात होते. तिथून निवृत्त झाल्यावर भारत सरकारच्या कोणत्याही खात्यात नोकरी न मिळाल्याने त्यांनी ट्रकचा धंदा सुरू केला. ट्रक चालवून त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले. मख्खन सिंह ज्या घरात राहात होते ते घर इ. स. १९६८ ला बांधण्यात आलेले असून कामठी रोडवरील प्रसिद्ध गुरुद्वाराच्या अगदी बाजूला आहे.
मिल्खा सिंग भारताची शान आहेत, तसेच मख्खनही देशाची शान आहेत. तुम्ही ज्याला सर्वाधिक वेगवान धावपटू म्हणता, त्याला एकदा तरी हरवणारा कुणी असेल तर तो महत्त्वाचा ठरतोच. त्यामुळेच मख्खन सिंह यांना अशा प्रकारे का डावललं गेलं असेल, हा प्रश्न पडतो. मिल्खा सिंहच्या जीवनातील मख्खन सिंह एक महत्त्वपूर्ण भाग आहे. चित्रपटात हा प्रसंग असला तर चित्रपटाच्या गाभ्यात इतर प्रसंगाप्रमाणे ‘रोमांचक’ ठरला असता. चित्रपटात फक्त एकदाच मख्खन यांचे नाव घेण्यात आले होते. त्याव्यतिरिक्त त्यांना कुठेही दाखविण्यात आले नाही.
इ.स. १९९० ला मख्खन सिंह पंजाबमध्ये गेले. गाव बहुला, जिल्हा- होशियारपूर येथे त्यांनी वास्तव्य केले. त्याच्या पायाच्या अंगठय़ाला ‘गँगरिन’ झालेले होते. त्यावर दिल्ली येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. काही दिवसांनी त्यांना पायाचा पंजा कापावा लागला. तर काही वर्षांनी त्यांचा पायच कापावा लागला. त्या काळात मिल्खा सिंहने त्यांना मदत केली. इ.स. २००१ ला डिसेंबर महिन्यात गुरुगोविंद सिंगच्या जयंतीच्या दिवशी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांना तीन मुले परमिंदर, इंद्रपाल, गोवा (मक्खन सिंह लाडाने लहान मुलाला ‘गोवा’ म्हणायचे.) आज मोठय़ा दोन मुलांचे निधन झालेले असून लहान मुलासोबत त्यांची पत्नी पंजाबमध्ये राहते. त्यांची बहीण सुरजीत कौर नागपूरला राहते.
नागपूरमधील डॉ. रामसिंह सदन येथील त्यांची खोली आजही बंद अवस्थेत आहे. त्यांचे काही नातेवाईक पहिल्या माळ्यावर राहतात. मख्खन सिंहचा भाचा, बहीण सुरजीत कौरचा मुलगा केवलसिंग व त्यांची पत्नी कुलविंदर कौर हे दोघे पती-पत्नी व त्यांचा परिवार वास्तव्यास आहेत. दुसऱ्या माळ्यावर त्यांचे मित्र व माजी सैनिक मनजीतसिंग बेवाबी राहतात. ते मख्खन  सिंहचे अत्यंत घनिष्ठ मित्र असून त्यांच्याबद्दल त्यांना अत्यंत अभिमान आहे. चित्रपटात मख्खन सिंहचा प्रसंग न दाखविल्याबद्दल मख्खन सिंग यांचा मित्रपरिवार तसेच नातेवाईक यांना अत्यंत दु:ख वाटते.
मख्खन सिंह यांचा करुण अंत झाला. मिल्खा सिंह हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यांच्या परिस्थितीबाबत त्यांनी दु:खही व्यक्त केले होते. या दोन जीवलग मित्रांचा एक जरी सीन असता आजच्या तरुण पिढीला दोन मित्रांची कहाणी समजली असती व त्यातून त्यांना स्फूर्ती मिळाली असती, असे राहून राहून वाटते.

Story img Loader