भारताच्या ऑलिम्पिक पदकांसाठी हुकमी खेळ मानला गेलेल्या कुस्ती या खेळाचे ऑलिम्पिकमधील स्थान कायम राहील, अशी संघटकांना आशा वाटत आहे, तर स्क्वॉश खेळाचा प्रथमच या स्पर्धेत समावेश होईल अशी खात्री या संघटकांना वाटत आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची सेंट पीट्सबर्ग येथे बुधवारी बैठक होत असून त्यामध्ये याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
आयओसीच्या बैठकीत कुस्ती, स्क्वॉश, बेसबॉल व सॉफ्टबॉल (एकत्रित सामने), कराटे, रोलर स्पोर्ट्स, स्पोर्ट्स क्लाईम्बिग, वाकेबोर्डिग या क्रीडाप्रकारांच्या समावेशाचे प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. फेब्रुवारीमध्ये आयओसीने २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धाकरिता २५ क्रीडाप्रकारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये कुस्तीला स्थान देण्यात आले नव्हते.
कुस्तीला वगळण्यात येणार असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने यापूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिका, रशिया, इराण आदी देशांनी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला ठेवत कुस्ती वाचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू केले होते. आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाची (फिला) १८ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कुस्ती हा खेळ अधिक लोकप्रिय होण्यासाठी अनेक बदल सुचविण्यात आले. प्रथमच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिला संघटकांना स्थान मिळाले आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे सरचिटणीस राजसिंग हे या सभेस उपस्थित होते. ते म्हणाले, आम्ही कुस्तीच्या स्वरूपात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. तसेच काही संघटनात्मक बदलही केले आहेत. आयओसीचे अध्यक्ष जॅक्वीस रॉज यांनी या बदलांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कुस्ती टिकविली जाईल अशी आम्हाला खात्री आहे. दोन मिनिटांच्या तीन फेऱ्यांऐवजी तीन मिनिटांच्या दोन फेऱ्यांची लढत राहील. तसेच प्रत्येक फेरीतील वैयक्तिक गुणांचा एकत्रित विचार केला जाईल.
घोशाल व दीपिकास ऑलिम्पिक पदकाच्या आशा!
स्क्व्ॉश महासंघाने ऑलिम्पिक प्रवेशासाठी अतिशय चांगल्या रीतीने आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल. त्याचबरोबर आमचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्नही साकार होईल असे भारताचे आंतरराष्ट्रीय खेळाडू सौरव घोषाल व दीपिका पालिकल यांनी येथे सांगितले. स्क्व्ॉश महासंघाने ऑलिम्पिक समितीच्या प्रतिनिधींसमोर आपला प्रस्ताव सादर केला त्या वेळी हे दोन्ही खेळाडू उपस्थित होते. या खेळाडूंनी पुढे सांगितले, आमचा खेळ अतिशय आकर्षक व लोकप्रिय होत चालला आहे. यापूर्वी या खेळाच्या समावेशाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र त्या वेळी आमच्या खेळाचा विचार झाला नव्हता. ऑलिम्पिक समावेशासाठी ज्या काही त्रुटी होत्या, त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

माजी ऑलिम्पिकपटू  बुबका आयओसीच्या अध्यक्षपदासाठी रिंगणात
सेंट पीट्सबर्ग : विश्वविक्रमी पोलव्हॉल्टपटू व माजी ऑलिम्पिकपटू सर्जी बुबका यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आयओसीचे अध्यक्ष जॅक्वीस रॉज यांच्या अध्यक्षपदाची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे.
आयओसीचे अध्यक्षपद हे अतिशय प्रतिष्ठेचे व प्रभावशाली पद मानले जाते. या पदासाठी उमेदवारी जाहीर करणारे बुबका हे सहावे उमेदवार आहेत. ते म्हणाले, अतिशय गांभीर्याने विचार करून मी हा निर्णय घेतला आहे. आपण लवकरच आपला अर्ज आयओसीकडे पाठविणार आहोत. आयओसीचे अध्यक्षपदाची जबाबदारी काय असते याची मला पूर्ण कल्पना आहे आणि हे आव्हान स्वीकारण्यास मी तयार आहे.
आयओसीचे विद्यमान उपाध्यक्ष थॉमस बाच (जर्मनी), निग सेर मियांग (सिंगापूर), अर्थ समितीचे अध्यक्ष रिचर्ड कॅरिओन (पोर्ट रिको), हौशी बॉक्सिंग संघटनेचे मुख्य सी.के.वुई (तैवान), आंतरराष्ट्रीय रोईंग महासंघाचे मुख्य डेनिस ओस्वॉल्डो (स्वित्र्झलड) हे अध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत.