चिवल्याचा विस्तीर्ण सुमुद्रकिनारा.. सफेद वाळूचा पसरलेला सर्वागसुंदर गालिचा.. निळ्याशार लाटांच्या बटांनी सजलेला समुद्र.. सूरबद्ध ऐकू येणारी समुद्राची गाज.. सकाळी सहा वाजता वाहणारी आल्हाददायक हवा, त्यामध्येच आपल्या तालामध्ये विहार करणारे डॉल्फिन आणि दुसरीकडे सागरी जलतरण स्पर्धेसाठी ओसंडून वाहणारा उत्साह, असे नयनरम्य चित्र चौथ्या सागरी जलतरण स्पर्धेच्या सुरुवातीला डोळ्यांना सुखावत होते. स्पर्धकांची एका बाजूला लगबग सुरू होती. या स्पर्धकांमध्ये होते सहा वर्षांचे चिमुकले, तर ७५ वर्षांचे आजी-आजोबाही. पण त्यांच्यापेक्षा दांडगा उत्साह होता तो या स्पर्धेत सहभागी झालेल्या ४० अपंग स्पर्धकांचा. विविध गटांनुसार बोटीतून स्पर्धकांची लगबग सुरू झाली.. बोटीतून ठरलेल्या अंतरावर स्पर्धकांना नेण्यात आले आणि गेट, सेट, गो.. हा गजर होताच साऱ्या स्पर्धकांनी समुद्रात धूम ठोकली आणि एका थरारनाटय़ाला सुरुवात झाली. प्रत्येकाला प्रथम क्रमांक पटकवायचा असल्याने त्यांच्यामध्ये चांगलीच स्पर्धा रंगली होती. अखेर या स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या स्वेजल मानकरने तर मुलींच्या गटात कोल्हापूरच्या निकिता प्रभूने बाजी मारली.
विविध गटांनुसार स्पर्धकांना बसवून त्यांची हजेरी घेण्याचा कार्यक्रम चालू असताना कुठेतरी लहानगे वाळूचा किल्ला बनवण्यात रमले होते, तर कुठे आपल्या गाठीशी असलेल्या अनुभवांची वरिष्ठांशी देवाण-घेवाण सुरू होती. दुसरीकडे अपंग स्पर्धक आणि त्यांचे सहकारी वातावरणाचा अंदाज घेत त्यानुसार आपण नेमके समुद्रात उतरल्यावर काय करायचे, याची रणनीती आखत होते. काही व्यावसायिक जलतरणपटूंचा एकीकडे व्यायाम सुरू होता, तर स्पर्धेचा फक्त आनंद लुटण्यासाठी आलेल्या स्पर्धकांच्या कोकणातल्या जुन्या आठवणींची उजळणी सुरू होती.
स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर ५ कि. मी., ३ कि. मी., २ कि. मी., १ कि. मी. आणि ५०० मीटर या गटांनुसार स्पर्धकांना ठरलेल्या अंतरावर नेण्यात आले आणि स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ध्येय गाठण्यासाठी समुद्रामध्ये एकामागून सूर मारत जलतरणपटूंनी स्पर्धेला सुरुवात झाली. समुद्रात सूर मारल्यावर एकमेकांवर कडी करत स्पर्धकांनी किनाऱ्याचा वेध घेतला आणि साहसी स्पर्धेचा एक दर्जेदार नमुना साऱ्यांनाच अनुभवता आला. समुद्राला आलेली भरती, फेसाळणारे स्वच्छ निळाशार पाणी, उसळणाऱ्या लाटा आणि किनाऱ्याच्या दिशेने वाहणारी हवा यामुळे स्पर्धकांचाही आत्मविश्वास कमालीचा उंचावलेला होता. त्यामुळे स्पर्धकांना यावेळी जास्त जोर लावावा लागत नव्हता, त्यामुळे दम लागण्याची शक्यताही कमी असल्याने स्पर्धकांनी कसलीही तमा न बाळगता स्वत:ला जलतरणासाठी झोकून दिले होते.
‘फ्री-स्टाइल’ प्रकाराचा उत्तम वस्तुपाठ पाहायला मिळत होता. एकमेकांना मागे टाकत किनाऱ्याजवळ जेव्हा जमिनीला पाय लागायला लागले तेव्हा स्पर्धकांनी जोरदार धावण्यावर भर दिला आणि समाप्त रेषेकडे जाण्यासाठी एकच चढाओढ लागली. त्यामध्ये ज्यांनी बाजी मारली, त्यांना पारितोषिक मिळाले आणि जे मागे पडले त्यांच्या गाठीशी एक साहसी, थरारक अनुभव आला.
जलतरणपटूंचे जिवाचे मालवण
चिवल्याचा विस्तीर्ण सुमुद्रकिनारा.. सफेद वाळूचा पसरलेला सर्वागसुंदर गालिचा.. निळ्याशार लाटांच्या बटांनी सजलेला समुद्र.. सूरबद्ध ऐकू येणारी समुद्राची गाज..
First published on: 23-12-2013 at 02:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malavan swimming games