वरिष्ठ अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत मलेशियन ग्रां.प्रि.बॅडमिंटन स्पर्धेत गुरुसाईदत्त आणि अरुंधती पानतावणे यांच्यावर भारताची भिस्त राहणार आहे. मंगळवारपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत अव्वल यशाकरिता त्यांना आपले कौशल्य पणाला लावावे लागणार आहे.
लागोपाठच्या स्पर्धामुळे सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, पारुपल्ली कश्यप यांनी या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत सौरभ, एच. एस. प्रणय, बी. साईप्रणीत, आर.एम.व्ही. साईगुरुदत्त यांच्याकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सौरभने यंदाच्या मोसमात टाटा खुली, ऑस्ट्रियन आंतरराष्ट्रीय चॅलेंज, इराण चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आदी स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे कामगिरी केली आहे.
सौरभ या आठव्या मानांकित खेळाडूला हाँगकाँगच्या यान कितचान याच्याशी खेळावे लागणार आहे. प्रणयने सईद मोदी चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. त्याने जर्मन खुल्या स्पर्धेत कश्यपवर सनसनाटी मात केली होती. त्याला येथे मलेशियाच्या जियान शिर्नेग चियांग याच्याबरोबर खेळावे लागणार आहे. साईप्रणीतपुढे इंडोनेशियाच्या महेबूब थोमी अझियान याचे आव्हान आहे.
शुभंकर डेला मलेशियाच्या तेक झेईसुओ याच्याशी खेळावे लागणार आहे. चेतन आनंदला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतील खेळाडूचे आव्हान असणार आहे तर, अनुप श्रीधर हा इंडोनेशियाच्या धर्मा अ‍ॅलेरी गुणा याच्याशी खेळणार आहे.
महिलांमध्ये तन्वी लाडला इंडोनेशियाच्या दिनार दियाह आयुस्टीनशी झुंजावे लागणार आहे. पानतावणेला पहिल्या फेरीत जपानच्या आयुमी मिने हिच्याशी खेळावे लागेल. पी.सी.तुलसी हिची इंडोनेशियाच्या हिरा देसी हिच्याशी गाठ पडणार आहे.