भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवडणूक प्रक्रियेतील गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संघटनेचे हंगामी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय नेटबॉल महासंघाचे सरचिटणीस हरी ओम कौशिक यांनी केली आहे. कौशिक हे आगामी निवडणुकीत खजिनदारपदासाठी निवडणूक लढवित आहेत.
कौशिक यांनी मल्होत्रा यांच्यावर टीका करताना सांगितले की, ‘‘मल्होत्रा यांनीच हेतूपूर्वक गोंधळ निर्माण केला आहे. ऑलिम्पिक संघटनेवर अनेक वर्षे काम करीत असताना मल्होत्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची (आयओसी) नियमावली व केंद्र शासनाच्या नियमावलींची माहिती नाही, ही हास्यास्पद गोष्ट आहे. या दोन्ही नियमावलींमध्ये खूप फरक आहे, याचा मल्होत्रा यांनी निवडणूक जाहीर करण्यापूर्वीच अभ्यास करण्याची आवश्यकता होती. आपल्या अज्ञानीपणामुळे टीकास्त्र ओढवून घेतले जाईल, असे माहीत असूनही मल्होत्रा यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमावलींकडे दुर्लक्ष केले.’’   

Story img Loader