जिम्नॅस्टिक्स आणि मल्लखांब या दोन खेळांपैकी कोणत्या खेळाचा पर्याय निवडू, असे जर मला कुणी विचारले तर मल्लखांब हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे मी सांगेन, असे फ्रान्सच्या ३८ वर्षीय माजी जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक व विद्यमान मल्लखांबपटू गॅले टिसीएर यांनी सांगितले.
‘‘मी बालपणी जिम्नॅस्टिक्स खेळले असून शाळेत प्रशिक्षक म्हणून देखील काम केले आहे. गेल्या वर्षभरापासून मी मल्लखांब खेळते आहे. या दोन खेळांमध्ये मल्लखांब हा अधिक प्रभावी, शरीरासाठी अधिक उपयुक्त, जास्त तंत्रशुद्ध आणि अत्यंत अवघड असूनही झटपट प्रगती करता येऊ शकणारा खेळ असल्याचे लक्षात आले आहे,’’ अशा भावना गॅलेने प्रकट केल्या.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गॅले या त्यांच्या कन्या कॅपुसिने आणि अलिक्स आणि बहीण कॅमेलेसह सराव करीत होती. मल्लखांबाची वैशिष्टये आणि त्याची उपयुक्तता बघून मी चकीत झाल्याचे गॅले यांनी सांगितले. ‘‘हा खेळ मुलांना शिकवणे प्रथमदर्शनी धोकादायक वाटला,म्हणून मीच या खेळाला प्रथम आजमावून पाहायचे ठरवले. त्यानुसार जेव्हा मी शिकण्यास प्रारंभ केला, तेव्हा मला हा खेळ जिम्नॅस्टिक्सपेक्षाही सर्वार्थाने उत्कृष्ट असल्याचे वाटले.’’
‘‘मल्लखांब या खेळाला अत्यल्प जागा लागते. कमी वेळात शरीराला अत्यंत उपयुक्त व्यायाम होतो आणि त्यासाठी लागणारे खांब किंवा दोरी ही उपकरणेदेखील जिम्नॅस्टिक्सच्या तुलनेत अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होतात. जिम्नॅस्टिक्स या खेळात सामान्य दर्जाचा खेळाडू हा सामान्य दर्जाच्या उपकरणांवर तर उच्च दर्जाचे खेळाडू उच्च दर्जाच्या उपकरणांवर सराव करतात. त्यामुळे जिम्नॅस्टिक्स हा खेळ दर्जा उंचावत जाईल तसा अधिकाधिक खर्चिक होत जातो,’’ असे गॅलेने सांगितले.
नेपाळ आणि बांगलादेश संघाला व्हिसाची अडचण
जागतिक मल्लखांब स्पर्धेसाठी येणाऱ्या १५ देशांच्या संघांपैकी नेपाळ आणि बांगलादेशच्या संघांना व्हिसाची अडचण निर्माण झाल्याने त्यांचे संघ स्पर्धेला पोहोचू शकणार नाहीत. तसेच अमेरिकेच्या संघालादेखील प्रायोजकत्व न लाभल्याने त्यांचे खेळाडू येणे रहीत झाले आहे. मात्र, तरीदेखील त्यातील एक-दोन खेळाडू स्वखर्चाने स्पर्धेत सहभागी होणार आहेत.