भारताच्या अनेक बॅडमिंटनपटूंनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केलं आहे. भारताच्या पीव्ही सिंधु, सायना नेहवाल यांनी वयाची पंचविशी गाठण्यापूर्वीच ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालत आपल्या कामगिरीची जगभरात छाप पाडली. पण महाराष्ट्रातील मराठमोळी मालविका बनसोड हिने बॅडमिंटनमधील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भारताची ही नवी बॅडमिंटन स्टार खेळाडू कोण आहे जाणून घेऊया.

गेल्या आठवड्यात, मालविकाने ऑल इंग्लंडमध्ये तिचा टॉप-१५ मधील दुसरा विजय नोंदवला. तिने यापूर्वी चीनमध्ये पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगला पराभूत केले होते. २३ वर्षांची असलेली मालविका ही सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधूसारखी फारशी सर्वांच्या परिचयाची नाही. पण बॅडमिंटनच्या कोर्टवरील तिची कामगिरी तितकीच उत्कृष्ट आहे. पण आपल्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही प्रायोजकत्त्वासाठी मालविका झगडताना दिसत आहे.

मालविका ही मूळची नागपूरची. तिथेच तिने बॅडमिंटनची धुळाक्षरं गिरवली. बॅडमिंटन आवड असली तरी मालविकाने कॉम्प्युटर इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. बॅडमिंटन कोर्टवर तिचा प्रवेश तसा उशिराच झाला. कॉम्पुटर इंजिनीयर असलेल्या मालविकाच्या आजोबांना बॅडमिंटनचे प्रचंड वेड होते आणि त्यांच्या नातीने बॅडमिंटन कोर्टमधील आपली कामगिरी कायम चालू ठेवावी अशी त्यांची इच्छा होती.

मालविकाची आई ही दंतवैद्यक आहे, पण आपलं क्लिनिक सांभाळून त्यांनी मालविकाला कसं डाएट लागेल याचा अभ्यास केला आणि त्यानुसार आखणी केली. मालविका नागपूरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे तिच्या डाएटसाठी तज्ञ नेमणं हे त्यांना परवडण्यासारखं नव्हतं. मालविकाकडे सिंधूसारखं निसर्गदत्त उंचीचं वरदान नाही ना सायनासारखी ताकद… पण तरीही मालविका पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली जेव्हा तिने दुखापतग्रस्त असलेल्या सायना नेहवालचा इंडिया ओपन स्पर्धेत पराभव केला. परंतु तरीही तिला फंडिंग देण्याकरता कोणीही पुढे आलं नाही. कारण तिने अद्याप पीव्ही सिंधूला पराभूत केलेलं नाही किंवा देशातली अव्वल बॅडमिंटनपटू झालेली नाही.

मालविका ही अत्यंत बुद्धिमान आहे आणि कोणच्याही सांगण्या, बोलण्याला बळी पडणारी ती नक्कीच नाही. ही मराठमोळी मुलगी गेल्या पाच वर्षांपासून न डगमगता आत्मविश्वासाने खेळताना दिसत आहे आणि तिने तिचे प्रशिक्षक आणि पालकांसह एक स्टार्टअप प्रमाणे सिस्टिम तयार केली आहे आणि यासह महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशिक्षकांकडून ती मार्गदर्शन घेत असते.

मालविका आधुनिक भारताची प्रतिनिधी आहे, म्हणूनच ती ग्रुप कोचिंग सिस्टिमपुरती मर्यादित राहिली नाही. तिची शिस्त आणि तिच्यातील प्रेरणा या तिला यशस्वी होण्यासाठी अधिक मदत करणाऱ्या आहेत. मालविका महत्त्वाकांक्षी तर आहेच पण एका बॅडमिंटनपटूला आवश्यक असा सहाय्यक प्रशिक्षकांचा ताफा तिच्याकडे नाही. त्यासाठी जो पैसा लागतो तो तिच्याकडे नाहीये. तिचे रँकिंग, मोठ्या नावांचा नसलेला पाठिंबा, भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू नसणं किंवा सिंधूची उत्तराधिकारी म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जात नाही, या सर्व मुद्द्यांमुळे मालविकाला प्रायोजिक मिळत नाही. पण या सर्व गोष्टी असल्या तरी तिने मेहनत घेणं थांबवलेलं नाही.

राष्ट्रीय पातळीवरील माजी खेळाडू विघ्नेश देवळेकर यांच्या मार्गदर्शनात ती सध्या खेळते. तिचे कोच प्रशिक्षणादरम्यान रणनीती आणि स्ट्रोक-शार्पनिंग भाग हाताळू शकतात, परंतु गेल्या आठवड्यात (ऑल इंग्लंड स्पर्धेत), हे स्पष्ट झालंय तिला एका फिजिओ आणि ट्रेनरची आवश्यकता आहे, जे जागतिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर असलेल्या मालविकाला अजून चांगली कामगिरी करण्यास मदत करतील आणि तिला जेतेपदांसाठी सज्ज करू शकतील. मालविका आणि तिच्या कुटुंबाला अशी आशा आहे की चांगल्या निकालांमुळे नक्कीच कोणाचे ना कोणाचे लक्ष वेधले जाईल आणि तिला आर्थिक पाठबळ मिळेल.

मालविका एक चांगली कॉम्प्युटर इंजिनीयर आहे, जी सध्याच्या घडीला हैदराबाद किंवा बंगळुरूसारख्या आयटी कॅम्पसमध्ये मोठ्या पगाराच्या पॅकेजची नोकरी करत असती किंवा मग इतर इंजिनीयर्सप्रमाणे अमेरिकेत नोकरीसाठी पोहोचली असती. पण भारतीय वंशाच्या अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरप्रमाणे मालविकादेखील क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्याचे आपले स्वप्न साकारू पाहत आहे.

मालविका बनसोड ही लॉस एंजिलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक २०२८ साठी पात्र ठरण्यासाठी ती कसून मेहनत घेते आहे. पण सद्यस्थिती पाहता ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणं हे तिच्यासाठी मोठा पर्वत सर करण्यासारखे आहे. जागतिक क्रमवारीत २८ व्या स्थानावरून पहिल्या १० खेळाडूंमध्ये पोहोचणे हे तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण कठीण आव्हान असणार आहे आणि त्यात आर्थिक पाठिंब्यासह अनेक निर्णय घ्यावे लागतील.

Story img Loader