चित्त्याच्या वेगाने पळणाऱ्या ‘वेगमानवा’चा जलवा पाहणे म्हणजे नयनरम्य सोहळाच. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्याने १०० किंवा २०० मीटरची शर्यतही जिंकलेली असते. बीजिंगपाठोपाठ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने आपल्या अद्वितीय कामगिरीचा नजराणा पेश करून सर्वानाच अचंबित केले. जगातील सर्वात वेगवान पुरुष असलेल्या या महान खेळाडूचे सामथ्र्य, वेग, ऊर्जा आणि कौशल्य म्हणजे दैवी देणगीच. हा वेगाचा महामानव म्हणजे युसेन बोल्ट.
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात,’ त्याचप्रमाणे युसेन बोल्टने शालेय जीवनातच आपल्यातील अंगीभूत कौशल्य दाखवून दिले होते. क्रिकेट आणि फुटबॉलची प्रचंड आवड असलेला बोल्ट क्रिकेटही सुरेख खेळायचा. आपल्या मालकीच्या किराणामालाच्या दुकानात बोल्टने लक्ष द्यावे, ही त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण बोल्ट आपल्या भावांसोबत रस्त्यांवर क्रिकेट खेळतानाच दिसायचा. पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वकार युनूसला आदर्श मानणाऱ्या बोल्टची वेगवान गोलंदाज बनण्याची इच्छा होती. बोल्टला क्रिकेट खेळताना पाहून त्याच्यात वेगवान शर्यत जिंकण्याची क्षमता दडली आहे, याचा साक्षात्कार झाल्यानंतर महान अॅथलिट पाब्लो मॅकनिल यांनी त्याला मैदानी खेळांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. वयाच्या १२व्या वर्षीच त्याने आपल्या क्षेत्रातील आपण सर्वात वेगवान धावपटू असल्याचे दाखवून दिले होते. विल्यम निब मेमोरियल हायस्कूलने त्या वेळी महान अॅथलिट जमैकाला दिले होते. सरावात कायम दुर्लक्ष करणाऱ्या बोल्टला आकार देण्याचे काम या शाळेने तसेच प्रशिक्षक पाब्लो मॅकनिल आणि ड्वेन नारेट यांनी केले.
कॅरेबियन बेटांवरील प्रतिष्ठेच्या कॅरिफ्टा स्पर्धेत २००१मध्ये २०० आणि ४०० मीटरमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बोल्टने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. एकापाठोपाठ दर्जेदार कामगिरीची नोंद करणारा बोल्ट नावारूपाला येत होता. पण तरुण वयात बोल्टची पावले किंगस्टनमधील रंगीबेरंगी दुनियेकडे वळली. फास्टफूडचे सेवन आणि नाइट क्लबमधील बोल्टच्या धिंगाण्याची वर्णने वर्तमानपत्रात वाचून त्याच्या प्रशिक्षकांनीही तोंडात बोटे घातली होती. पण सोनारानेच कान टोचल्यानंतर बोल्टला अक्कल आली. त्याने २००४च्या अॅथेन्स ऑलिम्पिकसाठी जमैका संघात स्थान मिळवण्याकडे लक्ष केंद्रित केले. बम्र्युडामधील कॅरिफ्टा स्पर्धेत २०० मीटरचे अंतर २० सेकंदांत पार करून बोल्टने जमैका संघात स्थान मिळवले. पण संघातील ज्युनियर खेळाडू असलेल्या बोल्टचे मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे त्याला पहिल्या फेरीतच बाद व्हावे लागले. ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करता न आल्याचे शल्य त्याला कायम बोचत राहिले. व्यावसायिक अॅथलीट बनण्यासाठी त्याने सरावावर लक्ष केंद्रित केले. पण शरीराने त्याला साथ दिली नाही. २००५ आणि २००६मध्ये दुखापतींनी डोके वर काढल्यामुळे बोल्टची कारकीर्द बहरण्याऐवजी कोमेजतेय की काय, अशी भीती निर्माण झाली होती.
२००६च्या मोसमाअखेरीस बोल्टने ४०० मीटर शर्यतींपाठोपाठ १०० मीटरमध्येही धावण्याचे ठरवले. पण त्यासाठी त्याच्यासमोर अट ठेवण्यात आली. १९७१मध्ये डॉन क्व्ॉरी यांनी रचलेला जमैकाचा राष्ट्रीय विक्रम अद्याप अबाधित होता. त्यानंतरच्या अनेक पिढय़ांना तो मोडता आला नव्हता. हा विक्रम मोडून दाखवला तर बोल्टचे १०० मीटरमध्ये धावण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. बोल्टने विक्रमी वेळेत हे अंतर पूर्ण करून प्रशिक्षकांना आपल्या गुणवत्तेची दखल घेण्यास भाग पाडले. २००८मध्ये जमैकातील राष्ट्रीय स्पर्धेत १०० मीटरमध्येच ९.७६ सेकंद अशी वेळ नोंदवून त्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. काही आठवडय़ांनंतर त्याने न्यूयॉर्क येथील रिबॉक ग्रां. प्रि.मध्ये ९.७२ सेकंद असा विश्वविक्रम रचत जगाला आश्चर्याचा धक्का दिला. २००८ बीजिंग ऑलिम्पिक, २०१२ लंडन ऑलिम्पिक, विश्व अजिंक्यपद स्पर्धा (२००९ बर्लिन, २०११ दिएगू आणि २०१३ मॉस्को) या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये बोल्ट नावाचा सूर्य तेजाने तळपत आहे. एकापेक्षा एक सरस कामगिरी करून अनेक वेळा विश्वविक्रमांची नोंद त्याने केली आहे. बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रत्येकी तीन सुवर्णपदके पटकावणाऱ्या बोल्टच्या नावावर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत आठ सुवर्ण आणि दोन रौप्यपदके जमा आहेत. बोल्ट आणि सुवर्णपदक हे जणू समीकरणच बनले आहे. बोल्टने
आपल्या जादुई कामगिरीने यापुढेही मंत्रमुग्ध करावे, हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.
वेगमानव!
चित्त्याच्या वेगाने पळणाऱ्या ‘वेगमानवा’चा जलवा पाहणे म्हणजे नयनरम्य सोहळाच. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्याने १०० किंवा २०० मीटरची शर्यतही जिंकलेली असते.
First published on: 24-08-2013 at 07:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man of speed