भारतात एप्रिल-मे हा क्रिकेटसाठी सुगीचा हंगाम. अन्य क्षेत्रांसाठी मात्र हाच काळ पानझडीचा असतो. या दोन महिन्यांत सासू-सुनांच्या मालिकांकडे लोक पाठ फिरवतात. रिअॅलिटी शोंचा टीआरपी खाली घसरतो. मोठय़ा बॅनर्सचे चित्रपट प्रदर्शित होत नाहीत. रस्ते, लोकल यामध्येही हा प्रभाव जाणवतो.. गेल्या सहा वर्षांतील ही जादू. ती केली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलने. या संकल्पनेचे जनक होते ‘व्यवस्थापन गुरू’ ललित मोदी. या व्यक्तीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेट, मनोरंजन आणि अर्थकारण या त्रिसूत्रीच्या बळावर श्रीमंत केले. बीसीसीआयच्या राजकारणाचे गणित या काळात मोदी यांना कळले, पण.. अखेर ‘अति तेथे माती’ झाली. २००८मध्ये ज्या बीसीसीआयने त्यांना डोक्यावर घेतले, त्याच संघटनेच्या धुरिणांनी मोदी यांच्या प्रशासकीय कारकीर्दीचा खेळ खल्लास केला.
मोदी यांच्या यशाची कथाही अपयशानेच सुरू होते. १९९३मध्ये इंग्लिश संघ भारतीय दौऱ्यावर येणार होता आणि प्रक्षेपणाच्या हक्कांबाबत बरीच खलबते सुरू होती. माधवराव शिंदे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. भारतात प्रक्षेपण करणाऱ्या दूरदर्शनची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी कट शिजत होता. त्यावेळी ट्रान्स वर्ल्ड इंटरनॅशनलने भारतीय क्रिकेट प्रक्षेपण विश्वात प्रवेश केला होता. इंदरजितसिंग बिंद्रा यांनी या वाटाघाटींमध्ये पुढाकार घेतला होता. परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले.
१९९४मध्ये हिरो चषक स्पध्रेच्या प्रक्षेपणावेळी दूरदर्शन आणि बीसीसीआय यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. अखेर दूरदर्शनला प्रत्येक सामन्यागणिक शुल्क देण्याचा व्यवहार झाला. यावेळी मात्र ट्रान्स वर्ल्डप्रमाणेच ईएसपीएन आणि स्टार स्पोर्ट्स यांनी भारतातील प्रक्षेपणाबाबत उत्सुकता दर्शवली. यात ईएसपीएनला यश मिळाले. या क्रीडावाहिनीच्या भारतीय प्रक्षेपण बाजारपेठेतील प्रवेशाप्रीत्यर्थ बंगळुरूला जंगी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदी यांचे भारतीय क्रिकेटला सर्वप्रथम दर्शन घडले. ईएसपीएनने भारतातील मार्केटिंगची सूत्रे मोदी एंटरटेन्मेंटकडे सोपवली होती. अनेक नावाजलेल्या वाहिन्यांच्या मार्केटिंगचा अनुभव गाठीशी असलेल्या मोदी एंटरटेन्मेंटची धुरा त्यावेळी ललित यांचे वडील के. के. मोदी सांभाळत होते. वडिलांकडेच ललितने कॉर्पोरेट संस्कृतीचे धडे गिरवले होते. त्यामुळे पाहता-पाहता १९९४ ते ९७ या कालखंडात ईएसपीएनने भारतीय क्रीडा प्रक्षेपण क्षेत्रावर अधिराज्य गिरवायला सुरुवात केली. तंत्रशुद्ध सादरीकरण, आकर्षक समालोचन आणि आकडेवारी यामुळे क्रीडाचाहत्यांना ईएसपीएनने मोहिनी घातली. त्यामुळे या यशाचे श्रेय ललित मोदी यांच्याकडेच जाते.
१९९६मध्ये इंटरसिटी फ्रेन्चायझी मॉडेल (मर्यादित ५० षटकांच्या सामन्यांचे) मोदी यांनी बिंद्रा यांना सादरीकरण केले. बिंद्रा यांनी हा प्रस्ताव जगमोहन दालमिया यांच्याकडे सुपूर्द केला. स्थानिक क्रिकेटला या प्रस्तावामुळे चांगले दिवस येतील, अशा शब्दांत बिंद्रा यांनी त्याचे कौतुक केले. ललित मोदी इंटरसिटी लीगचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मोदी यांनी अथक प्रयत्न सुरू केले. राजसिंग डुंगरपूर अध्यक्ष असताना पुन्हा बीसीसीआयच्या बैठकींना त्याचे सादरीकरण झाले. ग्वाल्हेर, मुंबई आदी शहरांचे संघ बांधण्याचे निश्चित करण्यात आले. बऱ्याच देशी खेळाडूंना चांगले मानधन देऊन करारबद्ध करण्यात आले. परदेशी खेळाडूंचा या प्रस्तावात समावेश करण्यात आला नव्हता. परंतु स्पध्रेची तयारी पूर्णत्वाकडे येत असताना दालमिया यांनी या स्पध्रेला ‘खो’ घातला. मोदी यांचे कोटय़वधी रुपये वाया गेले.
परंतु मोदी हार मानणाऱ्यांमधले मुळीच नव्हते. त्यांनी दालमिया यांच्याविरोधात दंड थोपटले. १९९९मध्ये बिंद्रा यांनीच मोदी यांना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्यत्व मिळवून दिले. ए. सी. मुथय्या यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयच्या जयपूरला झालेल्या बैठकीत मोदी कारभारात सक्रिय झाले. त्यावेळी हिमाचलला डावलण्याचे राजकारण सुरूच होते. परंतु मार्केटिंगमध्ये निष्णात असलेल्या मोदी यांनी हिमाचलसाठी पुरस्कर्तेही मिळवून दिले. २०००मध्ये मोदी यांच्याकडे पंजाबचे उपाध्यक्षपद चालून आले.
क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणाचा मुद्दा त्यावेळी पुन्हा ऐरणीवर होता. प्रक्षेपणातून ५०० कोटी रुपयांची आर्थिक कमाई अपेक्षित असताना प्रत्यक्षात फक्त १२५ कोटी रुपयांना ते हक्क विकले गेले. या प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी निविदा मागितल्या गेल्या असत्या तर बीसीसीआयला ५०० कोटींहून अधिक फायदा झाला असता अशा चर्चा रंगल्या. २००२मध्ये मोदी यांनी आपला इंटरसिटी प्रस्ताव पुन्हा चर्चेत आणला. दोन अब्ज डॉलर्सचा फायदा या स्पध्रेद्वारे होईल, असा लेखाजोखा त्यांनी मांडला. परंतु मोदी यांचे स्वप्न पुन्हा भंगले.
२००५मध्ये शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आणि मोदी उपाध्यक्ष. ही युती मग २०१०मध्ये शशी थरूर आणि मोदी यांच्यातील ‘ट्विटर’नाटय़ापर्यंत टिकली. जुलै २००६मध्ये बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी यांनी ट्वेन्टी-२० लीगचा नवा प्रस्ताव सादर केला. त्यावेळी क्रिकेटच्या या लघुरूपाचे गारूड नुकतेच जनमानसावर पडले होते. बीसीसीआयनेही त्या प्रकाराला मान्यता दिली होती. आयसीसीनेही दर दोन वर्षांनी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा संकल्प सोडला होता. या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या समर्थ पाठबळावर मोदी यांचे लीगचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले.
एप्रिल २००७मध्ये कॅरेबियन बेटांवर झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारताचे पानीपत झाले, राहुल द्रविडने या अपयशाची जबाबदारी घेत कर्णधारपद सोडले. भारतीय संघ मायदेशात परतण्याआधीच झी समुहाच्या सुभाषचंद्र गोयल यांनी मोदी यांच्या फॉम्युलावर आधारित इंडियन क्रिकेट लीग म्हणजेच आयसीएलची घोषणा केली. या बंडामुळे भारतीय क्रिकेटमध्ये दुफळी माजण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे बीसीसीआयला खडबडून जाग आली आणि १४ सप्टेंबर २००७ या दिवशी आयपीएलची अधिकृत घोषणा करण्यात आली. मग पुढे २०१०च्या नवी मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यापर्यंत हा मोदी नामाचा झेंडा फडकत होता. कोची टस्कर्स संघातील समभागधारकांची नावे मोदी यांनी ट्विटरवर मांडल्यामुळे थरूर यांना केंद्रीय मंत्रीपद गमवावे लागले आणि त्यानंतर मोदी यांच्या भ्रष्टनीतीची एकेक प्रकरणे बाहेर निघत गेली. आयपीएलच्या जनकाला स्पध्रेपासून बेदखल करण्यात आले. या काळातसुद्धा पवार यांनी मोदी यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु मोदी यांना ते मान्य नव्हते.
कोण होतास तू, काय झालास तू.. असे मोदी यांच्याबाबतीत मुळीच म्हणता येणार नाही. अमेरिकेतील डय़ूक विद्यापीठातून ललित यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. परंतु उद्योगाऐवजी त्यांनी निवड केली ती क्रीडा व्यवस्थापनाची. १९८५मध्ये शिक्षण चालू असतानाच अंमली पदार्थाच्या व्यवहारांमध्ये अडकल्यामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षाही झाली होती. अशा गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीला क्रिकेटपासून दूर ठेवावे, याकरिता त्यावेळी न्यायालयीन लढाईही झाली होती. परंतु त्यांच्या दोषांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत गुणांवर विश्वास ठेवण्याचा मोठेपणा बीसीसीआयमधील धुरिणांनी दाखवला. अखेर याच धुरिणांनी ‘नाकापेक्षा मोती जड’ होत असल्याची लक्षणे दिसताच मोदी त्यांचा नियोजनबद्ध काटा काढला.
१९७०मध्ये कॅरी पॅकर सर्कशीने सर्वानाच भुरळ घातली होती. पॅकर्स वर्ल्ड सीरिजच्या प्रयोगाने त्यावेळी क्रिकेटजगतात खळबळ माजवली होती, तीच जादू आयपीएलने आजमितीला जागतिक क्रिकेटमध्ये केली आहे. परंतु अपप्रवृत्तीने मिळवलेल्या यशाचा शेवटही तितकाच वाईट असतो. त्यामुळे मोदी यांच्या प्रशासकीय कारकीर्दीचा अस्त हा असाच होणार हे सर्वानाच अभिप्रेत होते. परंतु राजकारण, सत्ता आणि व्यवहार यात भावनांना थारा नसतो. काही वर्षांपूर्वी आर्थिक भ्रष्टाचारात अडकलेले ‘डॉलरमियाँ’ पुन्हा बीसीसीआयच्या राजकारणात सहजपणे वावरू लागले आहेत. मोहम्मद अझरुद्दीनवरील आजीवन बंदीला न्यायालयाने अभय दिल्याचे सर्वानाच ज्ञात आहे. त्यामुळे मोदीसुद्धा ‘फिरूनी पुन्हा परतेन मी..’ ही आशा बाळगू शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा