प्रोव्हिडन्स : कुलदीप यादवच्या कामगिरीत सातत्य असल्यामुळेच संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी उभे आहे. अर्थात, त्यामुळे माझे संघातील स्थान धोक्यात आहे, असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया भारताचा लेग-स्पिनर यजुवेंद्र चहलने व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत यजुवेंद्र चहलला संघात स्थान मिळाले नव्हते. ‘‘आमच्यासाठी संघ नियोजन आणि संघामधील समन्वयता याला प्राधान्य आहे. यात नवीन असे काहीच नाही. सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा किंवा अक्षर पटेल खेळतो. त्यामुळे खेळपट्टी अगदीच फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असेल, तरच संघ व्यवस्थापन तीन फिरकी गोलंदाजांचा विचार करते. सध्या तरी कुलदीप चांगली कामगिरी करत आहे,’’ असे यजुवेंद्र म्हणाला.

‘‘संघात स्थान मिळत नसले, तरी माझा संघाबरोबर नेटमध्ये सराव सुरू आहे. जेव्हा केव्हा मला खेळण्याची संधी मिळेल, तेव्हा संधीचे सोने करण्यासाठी मी तयार असेन,’’असेही यजुवेंद्रने सांगितले. सध्या एकदिवसीय आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले जात असले, तरी, जानेवारीपासून यजुवेंद्रला मर्यादित षटकांच्या सामन्यात संघात स्थान मिळालेले नाही.

‘‘क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाही. सांघिक खेळ आहे. प्रत्येक जण संघाच्या यशासाठी खेळत आहे. लागोपाठ मालिका असल्यामुळे एखाद्या खेळाडूला विश्रांती मिळणारच. अशा वेळी त्या खेळाडूचा भविष्यात विचारच होणार नाही, असे म्हणणे बरोबर नाही,’’ असेही यजुवेंद्र म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Management trust in kuldeep yadav is due to his consistent performance yajuvendra chahal amy