आगामी विश्व अजिंक्यपद स्पध्रेद्वारे ऑलिम्पिकसाठीचे स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील असलेला भारताचा आघाडीचा नेमबाजपटू मानवजीत सिंग संधूला इन्चॉन आशियाई क्रीडा स्पध्रेत पदकाची खात्री आहे. ऑलिम्पिकचे स्थान निश्चित झाले आणि आशियाई स्पध्रेत चांगली कामगिरी झाल्यास दोन वर्षांनी रिओमध्ये आत्मविश्वास दुणालेला असेल, असे विश्वचषक सुवर्णपदक विजेत्या संधूने सांगितले.
‘‘आशियाई क्रीडा स्पर्धा हे आमच्यासाठी मोठे व्यासपीठ आहे. या स्पर्धेत पदक मिळाल्यास ऑलिम्पिकसाठी मनोबल उंचावू शकते. सराव चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पदक मिळणे म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे,’’ असे मानवजीत म्हणाला.
नुकत्याच झालेल्या ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताच्या कामगिरीविषयी विचारले असता तो म्हणाला की, ‘‘प्रत्येक स्पर्धेगणिक भारताची कामगिरी सुधारत असून या देशामध्ये फक्त क्रिकेटच खेळला जात नाही, हे स्पष्ट होत आहे. मी व्यक्तीश: या कामगिरीने समाधानी आहे, पण अजूनही कामगिरीमध्ये सुधारणा करण्यासाठी वाव आहे.’’
यावेळी मानवजीतने तळागाळापर्यंत सोयी-सुविधा नसल्याची खंतही व्यक्त केली. तो म्हणाला की, ‘‘नेमबाजी हा फक्त श्रीमंताचा खेळ असल्याचे समजले जाते, पण तसे नाही. आता बऱ्याच लहान मुलांना नेमबाजीमध्ये यायचे आहे. अभिनव बिंद्राने पदक पटकावल्यानंतर बरीच मुलं या खेळाकडे वळत आहेत. वास्तविक पाहता आताच्या घडीला खेळाला प्रायोजक मिळत नाहीत. त्याचबरोबर चांगल्या सोयी-सुविधाही उपलब्ध नाहीत.’’

Story img Loader