मँचेस्टर युनायटेडने पिछाडीवरून मुसंडी मारत ब्रागा संघाचा ३-१ असा पराभव करून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली आहे. गटात अव्वल स्थान राखण्याबरोबरच स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारणारा युनायटेड हा तिसरा संघ ठरला आहे. चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बार्सिलोना संघाला मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सेल्टिक फुटबॉल क्लबने बार्सिलोनाचे आव्हान २-१ असे परतवून लावत सर्वाची वाहवा मिळवली.
गतविजेत्या चेल्सीने युक्रेनच्या शख्तार डोनेत्सक संघावर ३-२ असा विजय मिळवून बाद फेरीच्या अपेक्षा कायम राखल्या आहेत. ज्युवेन्टसने नॉर्दसजेलंड संघाचा ४-० असा धुव्वा उडवला. गेल्या वर्षी उपविजेते ठरलेल्या बायर्न म्युनिच संघाने फ्रान्सच्या लिले संघाला ६-१ अशी धूळ चारली. पेरूच्या क्लॉडियो पिझ्झारो याने हॅट्ट्रिक साजरी करत बायर्न म्युनिचच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. व्हॅलेन्सियाने बेट बोरिसोव्ह संघाला ४-२ असे पराभूत केले.
दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करणाऱ्या मँचेस्टर युनायटेडने शेवटच्या १० मिनिटांत तीन गोल करत बाद फेरीत मजल मारली. गेल्या मोसमात बाद फेरीत मजल मारता न आलेल्या युनायटेडच्या या कामगिरीमुळे प्रशिक्षक अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांना दिलासा मिळाला.    

Story img Loader