३२ वर्षीय मध्यरक्षक याया टोरेचे दोन गोल आणि विन्सेंट कॉम्पनीच्या एका गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) पहिल्या लढतीत वेस्ट ब्रॉमविक क्लबवर ३-० असा सहज विजय मिळवला. टोरे आणि विन्सेंटच्या प्रदर्शनामुळे रहिम स्टेर्लिग याचे पदार्पण मात्र दुर्लक्षित झाले. कट्टर प्रतिस्पर्धी चेल्सी आणि आर्सेनल यांची गुणतालिकेत झालेली घसरण पाहता मॅन्युएल पेलेग्रिनीच्या सिटीने संधीचे सोनं करण्याचा निर्धार बांधला आणि संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले.
९व्या मिनिटालाच सिटीने गोलचे खाते उघडले. नव्हास गोंझालेस याने ब्रॉमविकच्या खेळाडूंना चकवत चेंडू टोरेकडे सुपूर्द केला. टोरेने तो गोलजाळीच्या कॉर्नरवर टोलवून गोलरक्षकाची दिशाभूल केली. तेथे उभ्या असलेल्या डेव्हिड सिल्व्हाने तो पुन्हा टोरेकडे टोलवला आणि टोरेने चेंडू गोलजाळीत धाडून सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १५ मिनिटांनंतर टोरेने ही आघाडी दुप्पट केली. विलफ्राइड बॉनीच्या पासवर टोरेने २४व्या मिनिटाला दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत सिटीने २-० अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर ब्रॉमविककडून आक्रमक खेळ झाला, परंतु त्यांना गोल करण्यात अपयश आले. सिटीने मात्र आपली आघाडी आणखी मजबूत करण्यात यश मिळवले.
५९व्या मिनिटाला सिल्व्हाने कॉर्नरवरून टोलावलेला चेंडू हेडरद्वारे गोलजाळीत धाडून विन्सेंटने सिटीची आघाडी ३-० अशी भक्कम केली. ही आघाडी अखेपर्यंत कायम राखताना सिटीने विजयाची चव चाखत गुणतालिकेत अव्वल स्थान काबीज केले.

Story img Loader