मँचेस्टर सिटीने चेल्सीचा प्रतिकार मोडून काढत एफए चषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. समीर नास्रीने पहिल्या तर सर्जिओ अ‍ॅग्युरोने दुसऱ्या सत्रात गोल करत मँचेस्टर सिटीला भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र डेम्बा बाने गोल करत चेल्सीचे खाते उघडले. त्यानंतर बरोबरी करण्यासाठी चेल्सीने सातत्याने प्रयत्न केले; मात्र प्रशिक्षक रॉबटरे मॅन्सिनी यांच्या सिटी संघाने त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत.
इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडपेक्षा १५ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या मँचेस्टर सिटीला जेतेपदावर कब्जा करणे कठीण आहे. मात्र एफए चषक स्पर्धेत अंतिम फेरीत विगान अ‍ॅथलेटिक्सला नमवत जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सिटीचा संघ सज्ज झाला आहे. ११ मे रोजी एफए चषकाचा अंतिम सामना होणार आहे.
दुसरीकडे चेल्सीला पाचव्या एफए चषकाने हुलकावणी दिल्याचे दु:ख असेल. चॅम्पियन्स लीग स्पर्धेत स्थान पटकावण्यासाठी चेल्सी नव्या जिद्दीने शानदार प्रदर्शन करेल, असा विश्वास प्रशिक्षक राफेल बेनिटेझ यांनी व्यक्त केला.
सिटीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अ‍ॅग्युरोने गोल करण्याचा शानदार प्रयत्न केला. मात्र चेल्सीचा गोलरक्षक पीट्र सेचने अभेद्य बचाव करत हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. कालरेस टेवेझने गोलपोस्टच्या जवळून गोल करण्याचा प्रयत्न केला; मात्र हाही प्रयत्न अपुराच ठरला.
३५व्या मिनिटाला अ‍ॅग्युरोच्या पासचा उपयोग करून घेत समीर नास्रीने गोलपोस्टच्या जवळच सुरेख गोल केला आणि मँचेस्टर सिटीचे खाते उघडले. यानंतरही सिटीच्या खेळाडूंनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. मध्यंतरानंतर अ‍ॅग्युरोने गोल करत सिटीची आघाडी वाढवली. आत्मविश्वास उंचावलेल्या सिटीचे आणखी गोल करण्याचे मनसुबे मात्र चेल्सीच्या मजबूत बचावामुळे यशस्वी झाले नाहीत. बचावावर भर दिल्याने चेल्सीचे आक्रमण अपेक्षेप्रमाणे होऊ शकले नाही. ६६व्या मिनिटाला डेम्बा बाने गोल करत सिटीची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्९न केला. मात्र चेल्सीच्या या गोलनंतर सिटीने बचाव आणखी भक्कम करत गोल होऊ दिला नाही आणि विजयासह अंतिम फेरीत धडक मारली.
बार्सिलोनाने उडवला झारागोझाचा धुव्वा
बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग स्पर्धेत झारागोझाचा ३-० असा धुव्वा उडवला.
थिअगो अलकँटराने २०व्या मिनिटाला पहिला गोल केला. यानंतर टेलोने ३९व्या आणि ५३व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा