मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी हे इंग्लिश प्रीमिअर लीगमधील कट्टर वैरी संघ. या दोन्ही संघांमध्ये विस्तवही जात नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांप्रमाणेच युनायटेड आणि सिटी यांच्यात ईपीएल करंडक पटकावण्यासाठी चढाओढ सुरू असते. पण मँचेस्टर युनायटेड सॉकर स्कूलने मुंबईतील कूपरेज मैदानावरील सराव शिबिराचा गाशा गुंडाळल्यानंतर आता मँचेस्टर सिटीने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कूपरेज मैदानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मुंबईकरांना आय-लीग फुटबॉल स्पर्धेचा एकही सामना पाहण्याची संधी मिळाली नाही. मुंबईतील संघांना घरच्या मैदानावरील सामने कोल्हापूर किंवा पुण्यात जाऊन खेळावे लागले. त्याच काळात कूपरेजवर मँचेस्टर युनायटेडचे सॉकर स्कूल ऐटीत सुरू होते. मँचेस्टर युनायटेडने मुलांना फुटबॉलचे धडे गिरवण्यासाठी कूपरेज मैदानाच्या बाजूला स्वत: पैसे खर्च करून एक छोटेसे अ‍ॅस्ट्रोटर्फही बसवले होते. पण मँचेस्टर युनायटेडने जगभरातील सॉकर स्कूलचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेले शिबीरही ५ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात
आले.
आता कूपरेज मैदानावर मँचेस्टर सिटीने चार दिवसांचे फुटबॉल शिबीर आयोजित केले आहे. मँचेस्टर युनायटेड सॉकर स्कूलसाठी उभारलेल्या कार्यालयात आता मँचेस्टर सिटीने बस्तान बसवले आहे. मँचेस्टर युनायटेड सॉकर स्कूलमध्ये १५ दिवसांच्या एका सराव शिबिराला १२ ते १५ हजार रुपये मानधन आकारले जायचे. एका वेळच्या शिबिराला किमान २०० मुलांचा प्रतिसाद मिळत होता. आता मँचेस्टर सिटीचे हे शिबीर गरीब मुलांसाठी असले तरी भविष्यातील व्यवसायाच्या संधी लक्षात घेता, मुंबईतील पसारा वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
याविषयी मँचेस्टर सिटीचे सहप्रशिक्षक आणि व्यवसाय विकास व्यवस्थापक माईक ग्रेगरी म्हणाले की, ‘‘मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटीमधील वैर हे फक्त मैदानापुरते असते. सामना सुरू झाल्यावर वैर सुरू होते आणि सामना संपल्यावर ते संपते. त्यामुळे आम्ही या गोष्टीचा फारसा विचार करत नाही. फक्त मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यावर आमचा भर असतो.’’