लंडन : विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीच अर्जेटिनाच्या पराभवाचा धक्का फुटबॉल चाहत्यांना बसला. त्या धक्क्यातून सावरत नाही तो मॅंचेस्टर युनायटेडने रोनाल्डोला तातडीने मुक्त केल्याची घोषणा केली. रोनाल्डो आणि फुटबॉल चाहत्यांना हा धक्काच होता. रोनाल्डोचा व्यवस्थापक जॉर्ज मेंडेस अनेक क्लबबरोबर चर्चा करत आहे. मात्र, ३७ वर्षीय रोनाल्डो कुठल्या क्लबकडून खेळणार हे अजून स्पष्ट होत नाही. रोनाल्डो कोणाकडून खेळणार याचे उत्तर आता विश्वचषक फुटबॉल स्पर्धा संपेपर्यंत तरी मिळणार नाही. युरोपियन लीग असो वा अगदी सौदी अरेबियातील एक क्लब त्याच्यासाठी उत्सुक असले तरी विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत यावर कुणी निर्णय घेईल असे वाटत नाही.
रोनाल्डो मॅंचेस्टर युनायटेड सोडणार याचे संकेत गेले काही दिवस मिळतच होते. रोनाल्डोने एका मुलाखतीत क्लबने आपला विश्वासघात केल्याचे आणि क्लबचे काही भागीदार आपल्याला संघाबाहेर ठेवू इच्छित असल्याचे सांगितले होते. मॅंचेस्टरचे नवे व्यवस्थापक एरिक टेन हैग यांच्याशी देखील रोनाल्डोचे सूर जुळत नव्हते. या सगळय़ाची परिणीती रोनाल्डोला मुक्त करण्यात झाली. मॅंचेस्टरकडून खेळण्याची रोनाल्डोची ही दुसरी वेळ होती. रोनाल्डोने मॅंचेस्टरसाठी ३४६ सामने खेळताना १४५ गोल केले आहेत.
मँचेस्टर युनायटेडसोबत परस्पर सामंजस्याने मी क्लब सोडण्यास तयार झालो आहे. क्लब आणि चाहत्यांचा मी नेहमीच आभारी राहीन. त्यांच्याविषयी असलेले माझे प्रेम कधीच कमी होणार नाही. पण नव्या आव्हानांचा शोध घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे वाटल्याने हा निर्णय घेतला.
– ख्रिस्तियानो रोनाल्डो