कर्नाटकातील उडुपी येथील महाविद्यालयातून सुरू झालेला हिजाबचा वाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. याआधी नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्त्यी मलाला युसूफझाई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली होती. मलालाने ट्विटरवरुन या सर्व प्रकरणावर भाष्य केले होते. त्यानंतर मँचेस्टर युनायटेडचा फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पोग्बा याने या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे.
पॉलने यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये व्हिडिओ पोस्ट केला. हिंदुत्व जमाव कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम मुलीला लक्ष्य करत आहे, असे पॉलने म्हटले आहे. पुढील व्हिडिओमध्ये पॉलने वर्णद्वेषावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पॉलच्या या व्हिडिओमध्ये एका बाजूला हिजाब घातलेल्या मुली आहेत तर दुसऱ्या बाजूला भगवा परिधान केलेल्या मुलांचा जमाव घोषणाबाजी करताना दिसत आहे.
हिजाबवरुन सुरु असलेल्या वादात मलालाची उडी; भारतीय नेत्यांना केले आवाहन
कर्नाटकात शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बाजूने आणि विरोधात निदर्शने तीव्र झाली आहेत आणि काही ठिकाणी निदर्शनांना हिंसक वळणही लागले आहे. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.
पॉल पोग्बाने अशा प्रकरची प्रतिक्रिया देण्याची ही पहिलीच वेळ नाही. फ्रान्सचा स्टार मिडफिल्डर पोग्बा २०२० मध्ये कार्टूनचा वाद आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. पोग्बाने ऑक्टोबर २०२० मध्ये फ्रेंच राष्ट्रीय संघ सोडण्याची घोषणा केली होती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या इस्लामी दहशतवाद या विधानानंतर पॉल यांनी ही घोषणा केली.
काय आहे हिजाबचा वाद?
कर्नाटक सरकारने राज्यात कर्नाटक शिक्षण कायदा, १९८३ चे कलम १३३ लागू केले आहे. याअंतर्गत आता सर्व सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्यपणे परिधान करावा लागणार आहे. खाजगी शाळा देखील स्वतःचा गणवेश निवडू शकतात. या निर्णयावरून जानेवारीतच वाद सुरू झाला होता. उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयातून हा वाद सुरू झाला, जिथे महाविद्यालय प्रशासनाच्या नकारानंतरही सहा विद्यार्थिनी हिजाब घालून महाविद्यालयात पोहोचल्या होत्या. या वादानंतर इतर कॉलेजांमध्येही हिजाबवरून गोंधळ सुरू झाला.
पॉल पोग्बा कोण आहे?
फुटबॉलपटू पॉल पोग्बा विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. त्याने २०१३ मध्ये फ्रान्समधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि २०१८ च्या विश्वचषकात उल्लेखनीय भूमिका बजावली. क्रोएशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातही त्याने गोल केला होता. तो प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर युनायटेड आणि फ्रेंच राष्ट्रीय संघाकडून खेळतो. तो प्रामुख्याने सेंटर मिडफिल्डर म्हणून खेळतो.