रॉबिन व्हॅन पर्सीने पहिल्या सत्रातच झळकावलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने अ‍ॅस्टन व्हिलाचा ३-० असा पराभव करून इंग्लिश प्रीमिअर लीगच्या २०व्या जेतेपदाला गवसणी घातली. मँचेस्टर सिटीला टॉटनहॅमकडून १-३ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे मँचेस्टर युनायटेडला जेतेपदाची संधी चालून आली होती. प्रशिक्षक अ‍ॅलेक्स फग्र्युसन यांच्या युनायटेड संघाने मँचेस्टर सिटीला दुसरी संधी न देता अ‍ॅस्टन व्हिलाचा सहज पाडाव केला आणि चार सामने शिल्लक राखून ८४ गुणांसह इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले.
दुसऱ्या मिनिटालाच व्हॅन पर्सीने युनायटेडचे खाते खोलले. १३व्या मिनिटाला दुसरा गोल लगावल्यानंतर मध्यंतराच्या १२ मिनिटेआधी हॅट्ट्रिक साजरी करून व्हॅन पर्सीने युनायटेडला सामन्यावर पकड मिळवून दिली. ‘‘मी फारच आनंदी आहे. मला पहिल्या जेतेपदासाठी फारच प्रतीक्षा करावी लागली. हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे,’’ असे व्हॅन पर्सीने सांगितले. युनायटेडकडून ४०० सामने खेळणारा वेन रूनी म्हणाला, ‘‘गेल्या वर्षी अखेरच्या सामन्यात मँचेस्टर सिटीने आमच्याकडून जेतेपद हिरावून घेतले होते. पण आताचे जेतेपद हे त्या दु:खावर पांघरूण टाकणारे ठरले. जेतेपदामुळे आम्ही सर्वच आनंदी आहोत.’’