*   सुदैवी मनदीपच्या द्विशतकामुळे पंजाबचा ५८० धावांचा डोंगर
*   मुंबईचा १ बाद ६९ असा प्रारंभ; आणखी ५११ धावांनी पिछाडीवर
मुंबईला घरच्या मैदानात दुसऱ्या दिवशी पंजाबने चांगलेच पिदवले. पहिल्या सत्रातील निष्प्रभ गोलंदाजी आणि झेल सोडण्याचा सिलसिला कायम ठेवल्याचा फायदा पंजाबने चांगलाच उठवला. पहिल्या सत्रात मुंबईला एकही बळी मिळवता आला नसला तरी दुसऱ्या सत्रात सहा फलंदाज बाद करण्यात मुंबईला यश आले. रविवारीही सुदैवी ठरलेल्या मनदीप सिंगच्या द्विशतकाच्या जोरावर पंजाबने पहिल्या डावात ५८० धावांचा डोंगर उभारला. दिवसअखेर मुंबईची १ बाद ६९ अशी अवस्था असून ते अजूनही ५११ धावांच्या पिछाडीवर आहेत.
पहिल्या सत्रात मुंबईच्या निष्प्रभ गोलंदाजीचे पंजाबने चांगलेच धिंडवडे काढले. पहिल्या सत्रात मनदीप आणि अमितोझ सिंग यांनी मुंबईच्या गोलंदाजीचे वस्त्रहरण करत ३१.२ षटकांत ५.२२च्या सरासरीने तब्बल १६३ धावा लुटल्या. या दोघांनी अनुभवी रमेश पोवारच्या ५ षटकांत तब्बल ५० धावांचा पाऊस पाडला.
दुसऱ्या सत्रात अंकितच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात अमितोझने विकेट मुंबईला बहाल केली. त्याने ११ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ९१ धावांची खेळी साकारत मनदीपबरोबर तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली. आगरकरच्या गोलंदाजीवर कौस्तुभ पवारने मनदीपचा १९९ धावांवर ‘गली’मध्ये झेल सोडला आणि दोन धावा घेत मनदीपने द्विशतकाला गवसणी घातली. ३२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २११ धावा करणारा मनदीप अंकितच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. मनदीप बाद झाल्यावर पंजाबच्या खेळाडूंनी झटपट धावा जमवण्याचा प्रयत्न केला आणि ५८० धावांवर ते सर्वबाद झाले.
मुंबईने ३२ धावांवर असतानाच आदित्य तरेला (१८) गमावले. अजिंक्य रहाणे (खेळत आहे १८) शून्यावर असताना संदीप शर्माच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला, पण पंचांनी ‘नो बॉल’ दिल्यामुळे तो सुदैवी ठरला. २३ धावांवर असताना कौस्तुभला हरभजनच्या पहिल्याच षटकात पहिल्या स्लीपमध्ये मनदीपने जीवदान दिले. यानंतर अजिंक्य आणि कौस्तुभ पवार (खेळत आहे २६) यांनी सावध फलंदाजी करत दिवस खेळून काढण्याचे काम चोख बजावले.
संक्षिप्त धावफलक
पंजाब (पहिला डाव) : १५८.१ षटकांत सर्व बाद ५८० (मनदीप सिंग २११, अमितोझ सिंग ९१; अजित आगरकर ३/९५)
मुंबई (पहिला डाव) : १९ षटकांत १ बाद ६९ (कौस्तुभ पवार खेळत आहे २६, अजिंक्य रहाणे खेळत आहे १८; मनप्रीत गोणी १/१३)