Maharaja Trophy 2023 Final Hubli Tigers Vs Mysore Warriors: मनीष पांडेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भलेही खास कामगिरी केली नसेल, पण तो एक असा खेळाडू आहे जो त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. महाराजा लीग २०२३ मध्ये त्याने शानदार झेल घेऊन हे पुन्हा एकदा सिद्ध केले. सामन्याच्या रोमांचक वळणावर मनीषने हा झेल घेतला ज्यामुळे त्याचा संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.
मनीष पांडेने झळकावले अर्धशतक –
मंगळवारी महाराजा ट्रॉफीचा अंतिम सामना म्हैसूर वॉरियर्स आणि हुबळी टायगर्स यांच्यात बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. मनीष पांडेच्या नेतृत्वाखालील हुबळी टायगर संघानेप्रथम फलंदाजी करत २०४ धावा केल्या होत्या. मोहम्मद ताहाने ७२ आणि कर्णधार मनीष पांडेने केवळ २३ चेंडूत अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरात म्हैसूर वॉरियर्सनेही शानदार फलंदाजी केली. रविकुमार समर्थ आणि करुण नायर यांच्या भागीदारीच्या जोरावर सामना रोमांचक वळणावर पोहोचला.
म्हैसूर वॉरियर्सला विजयासाठी शेवटच्या चार चेंडूत ११ धावांची गरज होती. मावंथाने शेवटच्या षटकाचा दुसरा चेंडू टाकला आणि स्ट्राईकवर असलेल्या जगदीशा सुचितने लाँग ऑफला चेंडू खेळला. त्याचा फटका पाहून चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला असे वाटत होते, पण तेव्हाच चाहत्यांना असे काही दिसले की ज्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही.
मनीष पांडेने सीमारेषेवर घेतला अप्रतिम झेल –
सीमारेषेवर उभ्या असलेल्या मनीष पांडेने हवेत उडी मारली आणि चेंडू जवळजवळ सीमारेषा ओलांडून थांबवला, तो झेल घेऊ शकला नाही पण त्याने जमिनीला स्पर्श न करता चेंडू मैदानाच्या दिशेने फेकला. यामुळे फलंदाज तर बाद झाला नाही, पण महत्त्वाचे म्हणजे तो धावा वाचवण्यात यशस्वी. या धावांमुळे संघाने 8 धावांनी सामना जिंकून विजेतेपदही पटकावले. मनीष पांडेला या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.