विचारांना, कल्पनेला, ऊर्जेला वयाची वेसण असते असे म्हणतात. वाढत्या वयाबरोबर शारीरिक हालचालींमधील येणारा संथपणा मनातही डोकावतो. मात्र बॅडमिंटन संघटक मनोहर गोडसे या नैसर्गिक समीकरणाला अपवाद आहेत. बॅडमिंटनपटू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर एक विचार त्यांच्या मनात रुंजी घालू लागला. ज्या खेळाने जगण्याला अर्थ दिला त्याच्यासाठी काही तरी करावे, हा कृतज्ञ विचार घेऊन १९९७ मध्ये वयाच्या ५७व्या वर्षी त्यांनी मनोरा बॅडमिंटन स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली.
आजच्या घडीला मुंबईत कनिष्ठ गटासाठी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बॅडमिंटन स्पर्धामध्ये या स्पर्धेची गणना होते. एरव्ही स्पर्धा जिंकल्यानंतर बक्षिसाची रक्कम किती हा सर्वाच्याच दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असतो. मात्र या स्पर्धेमुळे लहान वयातच व्यावसायिक स्पर्धेचा मिळणारा अनुभव पैशापेक्षा अधिक मोलाचा असल्याचे खेळाडू आणि पालक सांगतात.
मध्यमवर्गीय मराठमोळ्या कुटुंबात बालपण व्यतीत केलेले गोडसे सांगतात, ‘‘आमच्या लहानपणी अशा स्पर्धाच नसायच्या. आम्हाला बॅडमिंटन खेळायचे आहे, त्यासाठी एखादा जिमखाना-क्लबचे सभासदत्व हवे आहे, असे वडीलधाऱ्यांना सांगायची भीती वाटत असे. स्पर्धात्मक स्वरूपाचे बॅडमिंटन खेळण्याची संधी मिळाली, मात्र खूप उशिराने. यामुळेच लहान वयातील मुलांसाठी स्पर्धा आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली.’’
गोडसे यांच्या मनोरा बॅडमिंटन अकादमीतर्फे वर्षांतून सरासरी पाच स्पर्धा होतात. १०, १३, १५ आणि १७ वर्षांखालील मुलामुलींसाठी आयोजित करण्यात येतात. यंदा अकादमीतर्फे ७५व्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ७२व्या वर्षीही गोडसे संयोजनात सक्रिय होते. सरकारी मदत, प्रायोजकांचा भरीव पाठिंबा या आधाराविना गोडसे नवोदित बॅडमिंटनपटूंना खेळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देत आहेत. सायना नेहवालच्या यशानंतर देशभरात बॅडमिंटनचा बोलबाला वाढला आहे. मात्र सोळा वर्षांपूर्वी क्रिकेटकेंद्री वातावरणात बॅडमिंटन स्पर्धा सुरू करण्याचे धाडस गोडसे यांनी दाखवले. केवळ सुरुवात करून न थांबता सातत्याने नेटक्या पद्धतीने ही स्पर्धा व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
‘‘माझ्या प्रयत्नांना मंजुळा आणि अशोक राव या बॅडमिंटनप्रेमी दांपत्याची मोलाची साथ आहे. या दोघांप्रमाणे नरेश नार्वेकर, अनंत चितळे आणि रवी वैद्य यांचा मदतीचा हातही माझ्यासाठी महत्त्वाचा होता. स्पर्धेसाठी कोर्ट उपलब्ध करून देणारे क्लब, जिमखाना, त्यांचे पदाधिकारी अशा अनेक मंडळींनी पाठिंबा दिल्यानेच या स्पर्धा सुरळीतपणे होतात,’’ असे गोडसे सांगतात. मनोराच्या स्पर्धेत चमकलेली अनेक मुलं-मुली राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखदार प्रदर्शन करत आहेत. खेळाडू-प्रशिक्षक आणि संघटक म्हणून गोडसे यांच्या कार्याला मिळणारी ही पोच पावतीच म्हणावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा