दै. ‘लोकसत्ता’मध्ये ७ मार्चला ‘ताजा कलम’मध्ये ‘शिवसेनाप्रमुखांनी शब्द पाळला, जोशी-महाडिक तुम्ही कधी पाळणार?’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी खुलासा केला असून ते वृत्त दिशाभूल करणारे आणि माझ्यावर अन्याय करणारे आहे, असे जोशी यांनी म्हटले आहे.
‘‘१९९७मध्ये मी मुख्यमंत्री असताना शिवाजी पार्कवर पहिल्या शिवशाही करंडक अखिल भारतीय कबड्डी स्पध्रेच्या पारितोषिक वितरण समारंभात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाच लाख रुपयांची वैयक्तिक मदत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनला घोषित केली. त्यानंतर मुख्यमंत्री निधीतून मी पाच लाख रुपयांची मदत कबड्डी असोसिएशनच्या इमारतीच्या बांधकामासाठी जाहीर केली. परंतु शिवाजी पार्कवर नव्याने कोणतेही बांधकाम करण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने नकार दिल्यामुळे या प्रस्तावाची कार्यवाही होऊ शकली नाही. शिवाय शिवशाहीचे सरकार बदलल्याने नव्या सरकारने काहीच पुढाकार न घेतल्याने ते काम होऊ शकले नाही. ही मदत माझी वैयक्तिक नव्हती, तरीसुद्धा माझ्यावर ठपका ठेवल्यामुळे ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत आहे,’’ असे जोशी यांनी म्हटले आहे.