राष्ट्रकुल स्पध्रेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमारने आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पध्रेत ६४ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मनोजने नेपाळच्या दीपक श्रेष्ठावर ३-० असा विजय साजरा करून आगेकूच केली. ५२ किलो वजनी गटात मदन लालने इराकच्या मुर्ताधा अल-सुदानीवर ३-० असा विजय मिळवला. कुलदीप सिंग यानेही ८१ किलो वजनी गटात चीनच्या आओलीन झँगला ३-० असे नमवून आगेकूच केली.
मनोजला पुढील फेरीत दुसऱ्या मानांकित कझाकस्थानच्या बॅशेनोव्हचा सामना करावा लागणार आहे. बॅशेनोव्हने उजबेकिस्तानच्या फाझलिद्दीन गैबनाजारोव्हवर ३-० असा विजय मिळवून आगेकूच केली आहे. मदनला पुढील फेरीत उजबेकिस्तानच्या शाखोबिदीन जोइरोव्हचे कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जोइरोव्हने जपानच्या रायोमेई तनाकाचा ३-० असा पराभव केला.
या दोन खेळाडूंपूर्वी एल. देवेंद्रो सिंग (४९ किलो), शिवा थापा (५६ किलो), विकास कृष्णन (७५ किलो), मनप्रीत सिंग (९१ किलोवरील) आणि सतीश कुमार (९१ किलो) यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj kumar in asian boxing championships quarters