राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालूनही भारताचा अव्वल बॉक्सर मनोज कुमारला दुसऱ्यांदा अर्जुन पुरस्कार डावलण्यात आल्यानंतर त्याने कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारला. अखेर मनोजला न्याय मिळाला असून लवकरच त्याला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. क्रीडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्कारासाठी त्याचे नामांकन मान्य केले आहे.
नवी दिल्लीत २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनोजने सुवर्णपदक मिळवले होते. ‘‘क्रीडा मंत्रालयातील सहसचिव ओंकार केडिया यांनी छोटय़ा भावाशी संपर्क साधून माझी अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्याचे सांगितले. बुधवारी सकाळी मला हा निर्णय समजला,’’ असे आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या मनोजने सांगितले.
बॉक्सर जय भगवानची अर्जुन पुरस्कारासाठी वादग्रस्त पद्धतीने शिफारस करण्यात आल्यानंतर मनोजने क्रीडा मंत्रालयाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी १५ खेळाडूंच्या यादीत मनोजचे नाव समाविष्ट करण्याचे आश्वासन त्याला देण्यात आले. पण आढावा बैठकीनंतरही मनोजला अर्जुन पुरस्कारासाठी डावलण्यात आल्यानंतर मनोजने कायदेशील लढा देण्याचा मार्ग अवलंबला. त्यानंतर त्याने याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
‘‘मला न्यायालयीन लढा देणे योग्य वाटत नव्हते. पण माझ्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. अर्जुन पुरस्कारासाठी मी योग्य असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मला आनंद झाला असून आशियाई स्पर्धेआधी आत्मविश्वास उंचावला आहे. क्रीडा मंत्रालय मला चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न करत होती. पण याविरोधात एकाकी लढा देणारा माझा भाऊ राजेशचा मी आभारी आहे. अर्जुन पुरस्कार मिळवण्यासाठी मला अशाप्रकारे लढा द्यावा लागला, याचे दु:ख होत आहे,’’ असेही मनोजने सांगितले.
मनोजचा उत्तेजक सेवनात समावेश असल्याचे समितीला वाटल्यामुळे अर्जुन पुरस्कारासाठी त्याचा विचार केला नाही, असे न्यायालयापुढे क्रीडा मंत्रालयाची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी सांगितले.
 

Story img Loader