भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी नेपाळ क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सोडले आहे. नेपाळ क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, मनोज प्रभाकर यांनी १५ डिसेंबर २०२२ रोजी नेपाळ पुरुष क्रिकेट संघाचे कोचिंग पद सोडले आहे. आम्ही त्यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
जूनमध्ये स्वीकारला होता पदभार –
मनोज प्रभाकर यांनी गेल्या जूनमध्ये नेपाळ क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी पुबुडू दासानायकेची जागा घेतली होती. दासानायके यांनी वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा दिला होता. प्रभाकर यांच्या देखरेखीखालील नेपाळ क्रिकेट संघाच्या कामगिरीतही झपाट्याने बदल झाला आहे.
केनियाविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका जिंकली –
अलीकडेच त्यांनी केनियाला ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-२ ने पराभूत केले होते. याशिवाय एकदिवसीय मालिकेतही संघाने ३-० असा एकतर्फी मालिका विजय मिळवला होता. नेपाळ क्रिकेट संघाचा हा दौरा ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान झाला होता.
नेपाळच्या वनडे दर्जाला धोका –
सध्या नेपाळ क्रिकेट संघ गंभीर संकटातून जात आहे. संघावर वनडे दर्जा गमावण्याचा धोका आहे. त्यातच मनोज प्रभाकर यांनी प्रशिक्षकपद सोडले आहे. त्यामुळे संघ दुहेरी संकटात सापडला आहेअशा परिस्थितीत संघ कसा तग धरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मनोज प्रभाकर यांची क्रिकेट कारकीर्द –
मनोज प्रभाकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी १९८४ ते १९९६ दरम्यान ३९ कसोटी आणि १३० एकदिवसीय सामने खेळले आहेत. याआधीही त्यांना कोचिंगचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या संघांसाठी ही जबाबदारी सांभाळली आहे. २००८ मध्ये ते दिल्लीचे गोलंदाजी प्रशिक्षक असताना दिल्ली संघाने रणजी करंडक जिंकला होता.