दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर आणि बंगालचा कर्णधार मनोज तिवारी यांच्यात रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील लढतीदरम्यान शनिवारी हमरीतुमरी झाली. या वेळी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणारे पंच के. श्रीनाथ यांनाही धक्काबुक्की झाली. त्यानंतर गंभीरच्या सामन्याच्या मानधनाच्या ७० टक्के तर तिवारीच्या मानधनाच्या ४० टक्के रक्कम दंड ठोठावण्यात आली आहे.

दिल्ली आणि बंगाल यांच्यातील फिरोज शाह कोटला स्टेडियमवरील सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मनन शर्माने आठव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बंगालचा सलामीवीर पार्था सारथी भट्टाचार्जीला बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या तिवारीने गोलंदाज मनन शर्माला थांबवले व ड्रेसिंग रूमच्या दिशेने हात दाखवून हेल्मेट आणण्यास सांगितले. तिवारी वेळ वाया घालवत असल्याचा समज दिल्लीच्या खेळाडूंचा झाला. तेव्हा पहिल्या स्लिपला उभ्या असलेल्या गंभीरने तिवारीला हिणावले. त्यानंतर वादाला सुरुवात झाली. ‘‘संध्याकाळी भेट, तुला मारतो,’’ असा गंभीरने इशारा दिला. त्यावर तिवारीने ‘‘संध्याकाळी कशाला, आत्ताच बाहेर चल,’’ असे प्रत्युत्तर दिले. दोघेही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावले व पंच श्रीनाथ यांना मध्यस्थी करावी लागली. या वादात गंभीरने श्रीनाथ यांना धक्का दिला. मात्र यावेळी कुणीही माघार घेण्यास तयार नव्हते.

Story img Loader