Manoj Tiwary has come out of retirement for a year to play for West Bengal: पाच दिवसांपूर्वीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा क्रिकेटपटू मनोज तिवारीने आपली निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो यापुढेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळणार आहे. तो ममता सरकारमध्ये क्रीडामंत्री आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून आठ वर्षांपासून त्याला भारतीय संघात स्थान मिळाने नाही. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण आता मनोज तिवारीने निवृत्तीचा निर्णय बदलला आहे. तो पुन्हा एकदा बंगालकडून क्रिकेट खेळताना दिसणार असल्याचे एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज तिवारीने निवृत्ती मागे घेण्याची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुलीही उपस्थित होते. संभाषणादरम्यान, मनोज तिवारीने यांनी निवृत्तीनंतर यू-टर्न घेण्याचा निर्णय का घेतला हे स्पष्ट केले. या क्रिकेटपटूने सांगितले की, त्याने आपला निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला आहे आणि रणजी करंडक जिंकण्यासाठी आणखी एक प्रयत्न करायचा आहे.
मनोज तिवारी म्हणाला, ‘गेल्या मोसमात बंगालचे कर्णधारपद भूषवून अंतिम फेरी गाठणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. खेळाला अलविदा करण्यापूर्वी मला हे जेतेपद पुन्हा एकदा मिळवायचे आहे. मी पुढच्या वर्षी दुसऱ्यांदा ‘यू-टर्न’ घेणार नाही, मला बंगाल क्रिकेटला आणखी एक वर्ष द्यायचे आहे.”
हेही वाचा – BCCI Income Tax & Earnings: बीसीसीआयने २०२१-२२ मध्ये केली अब्जावधींची कमाई, तर १००० कोटींहून अधिक भरला कर
पत्नी ओरडल्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला –
३७ वर्षीय तिवारीने सांगितले की, इन्स्टाग्रामवर निवृत्तीची पोस्ट टाकून क्रिकेटला अलविदा करण्याच्या त्याच्या अचानक निर्णयाने पत्नीसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याने सांगितले, “माझी पत्नी जिममध्ये गेली होती आणि परत आल्यावर ती माझ्यावर ओरडली. स्नेहशिष गांगुलीनेही मला पुनरागमनासाठी पटवून दिले. मी निवृत्तीनंतर एक वर्षासाठी पुनरागमन करत आहे. बंगाल क्रिकेटने मला सर्व काही दिले आहे. मला शेवटचा प्रयत्न करायचा आहे, मग तो खेळाडू म्हणून असो किंवा कर्णधार म्हणून.”
८ वर्षांपासून टीम इंडियात स्थान मिळाले नाही –
मनोज तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा (९,९०८ धावा) ऐतिहासिक विक्रम गाठण्यासाठी ९२ धावांनी कमी आहे. १९ वर्षांच्या आपल्या शानदार कारकिर्दीत त्याने ४८.५६ च्या सरासरीने २९ शतके झळकावली. त्याने २००४ मध्ये ईडन गार्डन्सवर दीप दासगुप्ताच्या नेतृत्वाखाली दिल्लीविरुद्ध पदार्पण केले होते.
मनोज तिवारीने २००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने भारतासाठी १२ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने २६.०९ च्या सरासरीने २८७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १ शतक आणि अर्धशतकांचा समावेश आहे. ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १०४ होती. टी-२० इंटरनॅशनलबद्दल बोलायचे, तर त्याने १५ च्या सरासरीने ५ धावा केल्या आहेत. त्याने शेवटचा सामना २०१५ मध्ये खेळला होता.