Manoj Tiwary vs Gautam Gambhir controversy : टीम इंडियासाठी १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या मनोज तिवारीने नुकतीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ईडन गार्डन्सवर बिहारविरुद्धच्या रणजी सामन्यानंतर बंगालच्या या दिग्गज फलंदाजाने निवृत्ती घोषणा केली. निवृत्तीनंतर मनोज तिवारीने असे अनेक खुलासे केले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. स्पोर्ट्स नाऊशी बोलताना मनोजने रणजी सामन्यादरम्यान भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरशी झालेल्या वादाचा खुलासा केला आहे.
२०१५ मध्ये फिरोजशाह कोटला येथे बंगाल आणि दिल्ली यांच्यात अ गटाचा सामना खेळला जात होता. मनोज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो कॅप घालून आला होता, पण वेगवान गोलंदाज दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करणार असल्याचे लक्षात येताच त्याने लगेच हेल्मेट मागितले. अशा स्थितीत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गंभीरला राग आला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली.
‘तू मॅचनंतर बाहेर भेट, आज तू गेलास’
मनोजने सांगितले की, गंभीरने त्याला म्हणाला होता की, ‘तू मॅचनंतर बाहेर भेट, आज तू गेलास.’ ३८ वर्षीय मनोज पुढे म्हणाला, “त्याचे असे म्हणणे बालिश कृत्य होते. कोटलामध्ये पत्रकारांसाठी बसण्याची जागा मैदानाच्या आत आहे आणि तिथे उपस्थित असलेले प्रत्येकजण एकेक गोष्ट ऐकतो. पण माझ्या शरीराकडे आणि त्याच्या शरीराकडे पाहता कोणाला माहित संध्याकाळी कोण भेटणार?” असं म्हणत मनोज हसायला लागला.
हेही वाचा – WPL 2024 : महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटनात बॉलीवूडची झलक, शाहरुख-वरूणसह ‘हे’ स्टार्स करणार परफॉर्म
मात्र, मनोज म्हणाला की, गंभीरसोबत झालेल्या भांडणाबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. मनोज म्हणाला, “त्या दिवशी गंभीरशी झालेल्या भांडणाबद्दल मला एकच खंत आहे की, जे लोक मला ओळखतात ते तुम्हाला सांगतील की मी वरिष्ठांशी भांडणारा माणूस नाही. त्यामुळे मला आठवायला आवडणार नाहीत, अशा आठवणींपैकी ही एक. माझे माझ्या वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत, पण त्या एका घटनेमुळे माझी प्रतिमा डागाळली.”
“पण यामध्ये माझी चूक नव्हती”
तो पुढे म्हणाला, “गंभीर एक उत्कट क्रिकेटर आहे आणि मीही आहे. पण कधी कधी उत्कटतेमुळे काही अशा गोष्टी समोर येतात, ज्या लोकांसमोर येऊ नयेत. हे अनपेक्षित होते आणि इतरही अनेक गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. पण यामध्ये माझी चूक नव्हती.” यानंतर जेव्हा त्याला विचारले गेले की दोन्ही क्रिकेटपटू त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी भेटले का? तर मनोज म्हणाला, “नाही, आम्ही याविषयी कधी बोललो नाही ना भेटायला वेळ मिळाला.”