गुजरातचा कर्णधार मनप्रीत सिंगचा दावा

क्रिकेटपेक्षाही कबड्डी हा अधिक गतिमान व वैविध्यपूर्ण कौशल्य असलेला खेळ आहे. त्यामुळेच प्रो कबड्डी लीगमध्ये संघांची संख्या वाढली असली व स्पर्धेचा कालावधी लांबणार असला तरी ही लीग कंटाळवाणी होणार नाही, असा दावा गुजरात फॉच्र्युन जाएंटस् संघाचे प्रशिक्षक मनप्रीत सिंग यांनी केला आहे.

गुजरात फॉच्र्युन जाएंटस् संघाचा जर्सी अनावरण कार्यक्रम बुधवारी झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मनप्रीत सिंग म्हणाले, ‘‘प्रो कबड्डी लीग यंदा जवळपास तीन महिने चालणार आहे. साहजिकच त्यामध्ये तोचतोचपणा दिसून येणार काय व त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या संख्येवर होणार काय, अशी शंका अनेकांना वाटू लागली आहे. मात्र क्रिकेटसारखे इथे होणर नाही. हा अतिशय गतिमान खेळ आहे. तसेच प्रत्येक खेळाडूचे कौशल्य खूप वेगळे असते.’’

संघाच्या कामगिरीबाबत विचारले असता मनप्रीत म्हणाले, ‘‘आमच्या संघातील बरेचसे खेळाडू युवा वर्गातील आहेत. त्यामुळे सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी ते उत्सुक झालेले आहेत. प्रदीर्घ चालणाऱ्या या लीगमध्ये शेवटपर्यंत शारीरिक तंदुरुस्ती टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनेच आम्ही युवा खेळाडूंना अधिक प्राधान्य दिले आहे.’’

या संघाचे साहाय्यक प्रशिक्षक नीर गुलिया म्हणाले, ‘‘ही लीग युवा खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ आहे. केवळ स्पर्धात्मक सरावावर भर न देता एकूण आठ तासांच्या सरावामध्ये जिम, पोहणे, स्नायूंच्या बळकटीचे विविध व्यायाम, अन्य पूरक व्यायाम यावर आम्ही भर दिला आहे. अबोझर मिघानी व फाजल अत्राचेली हे दोन्ही इराणचे खेळाडू आमच्या संघाचे आधारस्तंभ आहेत.’’

‘‘कर्णधारपदाची प्रथमच जबाबदारी माझ्यावर आली आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडताना संघास विजेतेपद मिळवून देण्यावरच माझा भर राहणार आहे. संघात युवा खेळाडूंचा भर असला तरी संघात चांगला समतोल व सुसंवाद आहे,’’ असे संघाचा कर्णधार सुकेश हेगडेने सांगितले.

गुजरातच्या संघात स्थानिक खेळाडूचा अभाव

जागतिक स्पर्धेचे आयोजन येथे झाले होते, त्या वेळी गुजरातच्या किरण परमार याचा भारतीय संघात समावेश होता. मात्र प्रो कबड्डी लीगमधील गुजरातच्या संघात स्थानिक खेळाडूचा समावेश करण्यात आला नाही. या लीगसाठी यंदा लिलावाकरिता तयार करण्यात आलेल्या खेळाडूंच्या यादीत गुजरातचा एकही खेळाडू नव्हता. त्यामुळे यंदा एकही स्थानिक खेळाडू नाही, असे अंशू मलिक यांनी सांगितले. जर कुस्ती खेळले नसते तर कबड्डीत करिअर केली असती. या खेळाच्या लोकप्रियतेने क्रिकेटला मागे टाकले आहे असे माझे स्पष्ट मत आहे.’’

उद्घाटन समारंभात साधेपणावर भर

व्यावसायिकांचे राज्य ही ओळख न राहता क्रीडा क्षेत्रातील अग्रेसर राज्य म्हणून गुजरातची प्रतिमा निर्माण करण्याचे ध्येय आहे. हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवतच भपकेबाज समारंभावर भर न देता अतिशय साध्या व सुटसुटीत कार्यक्रमाद्वारे गुजरात फॉच्र्युन जाएंटस्च्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. उद्घाटनासाठी कोणत्याही चित्रपट कलाकारावर वारेमाप खर्च करण्याऐवजी युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायक असलेल्या ऑलिम्पिक कुस्तीपटू गीता फोगटला निमंत्रित करण्यात आले. तसेच संगीत किंवा नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमांवर खर्च करण्याऐवजी तोच खर्च खेळाडूंवर व राज्यातील क्रीडा विकासावर आम्ही भर दिला असे गुजरातच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमास गुजरातच्या संघाचे प्रशिक्षक नीर गुलिया व मनप्रीत सिंग, कर्णधार सुकेश हेगडे, अदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदानी व मुख्य कार्यपालन अधिकारी अंशू मलिक उपस्थित होते.