आंतरराष्ट्रीय स्तरावरील ८५ सामने खेळण्याचा अनुभवी गाठीशी असणाऱ्या मनप्रीत सिंग याच्याकडे मेजर ध्यानचंद स्टेडियमवर ६ ते १५ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. हॉकी इंडियाने बुधवारी १८ खेळाडूंच्या भारतीय संघाची निवड येथे जाहीर केली.
जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत उपकर्णधारपद सांभाळणाऱ्या अमित रोहिदास याच्याऐवजी कोठाजितची वर्णी लावण्यात आली आहे. सलामीच्या लढतीत भारताची नेदरलँड्स संघाशी गाठ पडणार आहे. भारताला साखळी गटात दक्षिण कोरिया व कॅनडा यांच्याशीही खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रेग क्लार्क यांनी सांगितले, ‘‘ही स्पर्धा आमच्या खेळाडूंची कसोटी पाहणारी स्पर्धा असणार आहे. अर्थात आमच्या संघातील अनेक खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघातील खेळाडूंबरोबर खेळले आहेत. त्याचा फायदा त्यांनी येथे घ्यावा अशी अपेक्षा आहे.’’

Story img Loader