‘‘खेळाडू चांगला खेळायला लागला की त्याचे नाव मोठे होते. त्याला प्रसिद्धी मिळायला लागते. साऱ्यांच्या नजरा त्या खेळाडूवर रोखल्या जातात. पण त्याचबरोबर प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या रडारवर हे खेळाडू येतात आणि त्यांच्या खेळाचा अभ्यास करून प्रतिस्पर्धी त्यांना बहुतांशी वेळी रोखण्याचा यशस्वी प्रयत्न करतात. सध्या अव्वल क्रमांकावर असलेल्या पाटणा पायरेट्सच्या खेळाडूंना प्रसिद्धी नसल्यामुळे त्यांच्याकडून दमदार कामगिरी झाली,’’ असे पाटणा पायरेट्सचा कर्णधार मनप्रीत सिंगला वाटते. संघातील खेळाडूंना जास्त प्रसिद्धी नसल्याचा फायदा आम्हाला यावेळी झाला. कारण त्यांच्या खेळाची माहिती बऱ्याच जणांना नाही. त्यामुळे हेच या हंगामातील यशाचे एक रहस्य आहे, असे मनप्रीतने सांगितले.
गेल्या दोन हंगामांत पाटणाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण या हंगामात मात्र त्यांना कोणताही संघ पराभूत करू शकलेला नाही. या हंगामात हे चित्र कसे पालटले, असे विचारल्यावर मनप्रीत म्हणाला की, ‘‘यामागे जिद्द, अथक मेहनत आणि चिकाटी आहे. या हंगामाच्या पूर्वी आमचे ४५ दिवसांचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले होते. या दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी आम्ही नऊ तास सराव करत होतो. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करून त्यांना रोखण्याची रणनिती आखत होतो. गेल्या दोन्ही हंगामात चांगली कामगिरी करता न आल्याने या हंगामात काही तरी करून दाखवण्याची जिद्द होती. प्रत्येक गोष्टी शिकण्यासाठी आम्ही चिकाटी दाखवली. यश मिळवण्याचा कोणताही सोपा रस्ता नसतो. खडतर रस्त्यांवरून चालत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत.’’
या हंगामातील कामगिरीबद्दल मनप्रीत म्हणाला की, ‘‘आम्ही या हंगामासाठी जी रणनीती बनवली होती, त्याची अंमलबजावणी आम्हाला करता आली, याचा आनंद आहे. या हंगामात आम्ही नावारुपाला आलो आहोत. या हंगामापूर्वी संघातील खेळाडूंना जास्त कोण ओळखत नव्हते. त्यांनी कामगिरीच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. चढाई आणि पकडी चांगल्या होत आहेत, संघात चांगला समन्वय आहे.
यापुढील वाटचालीबाबत मनप्रीत म्हणाला की, ‘‘आम्ही जवळपास उपांत्य फेरीत पोहोचलो आहोत. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कशी कामगिरी करायची, याची रणनिती आम्ही आखायला सुरुवात केली आहे. कारण हा सामना आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. उपांत्य फेरी जिंकून आम्हाला जेतेपदाच्या दिशेने ठोस पाऊल टाकता येईल. त्यामुळे आता उपांत्य फेरीतील कामगिरीचाच विचार आमच्या मनात आहे.’’

खेळाडूंना जपण्याचा प्रयत्न
आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये आम्ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पण ही चांगली कामगिरी करताना काही खेळाडू जायबंदीही झाले आहेत. आमचा महत्त्वाचा खेळाडू सुरेश कुमार जायबंदी असल्याने काही सामन्यांमध्ये खेळणार नाही. त्यामुळे यापुढे उपांत्य फेरीत सर्वोत्तम संघ उतरवण्यासाठी आम्ही खेळाडूंना जपण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही ठराविक फरकाने खेळाडूंना विश्रांती देणार आहोत, असेही मनप्रीतने सांगितले.

Story img Loader