आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता बॉक्सर मनप्रीत सिंग आणि मनोज कुमार यांनी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मनप्रीतने सेचेलेस देशाच्या केडी आग्नेस याचा धुव्वा उडवत आगेकूच केली. मनोजने तुर्कीच्या फेथ केलेसवर मात केली.
पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत मनप्रीतने जोमाने पुनरागमन करत आग्नेसवर वर्चस्व गाजवले. मनप्रीतने हा सामना ३०-२७, ३०-२७, ३०-२७ असा ३-०ने सहज जिंकला. ‘‘प्रतिस्पर्धी बॉक्सर अनुभवी असतानाही मनप्रीतने तिन्ही फेऱ्यांवर प्रभुत्व गाजवले. मनप्रीतने अप्परकट आणि सरळ पंचेस लगावत प्रतिस्पध्र्याला रिंगमध्ये स्थिर होण्याची संधीच दिली नाही. २८ वर्षीय मनप्रीतला आता खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या अझरबैजानच्या तैमूर माम्मादोव्ह याच्याशी त्याला लढत द्यावी लागणार आहे. अव्वल मानांकित तैमूर आणि मनप्रीत यांच्यातील हा सामना सोमवारी होईल. संघर्षपूर्ण मुकाबल्यात मनोजने फेथवर ३-० असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत मनोजची कॅनडाच्या युव्स युलिसीची लढत होणार आहे.

Story img Loader