नवी दिल्ली : एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकांची कमाई केल्यानंतर भारताची पिस्तूल नेमबाज मनू भाकरने भविष्यात आणखी ऑलिम्पिक पदके जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले.एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत एकापेक्षा अधिक पदक मिळविणारी मनू स्वातंत्र्योत्तर काळातील पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. ऑलिम्पिक समारोप सोहळ्यानंतर मनू मायदेशी परतली. ‘‘ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू कठोर मेहनत घेत असतो, पण जर एकाच स्पर्धेत दोन पदके मिळविली गेली, तर ते वेगळेपण ठरते. माझ्याकडून हे साध्य झाले. आता भविष्यात अशीच कठोर मेहनत घेऊन सहभागी होणाऱ्या प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्याचे लक्ष्य आपण ठेवले आहे,’’ असे मनूने सांगितले.

‘‘समारोप सोहळ्यात भारतीय संघाची ध्वजवाहक होण्याची संधी मिळाली हा मी सन्मान समजते. या वेळी तर श्रीजेशबरोबर ही संधी मिळाल्याने अधिक आनंद झाला. श्रीजेश यांना मी लहानपणापासून ओळखते. त्यांच्या खेळाची मी चाहती आहे. त्यांचा स्वभाव खूप मैत्रीपूर्ण आणि शांत आहे,’’असेही मनू म्हणाली.ऑलिम्पिकनंतर मनू गेल्याच आठवड्यात मायदेशी परतली होती. मात्र, समारोप सोहळ्यासाठी ध्वजवाहकाचा मान मिळविल्यावर मनू कुटुंबासह पुन्हा पॅरिसला रवाना झाली होती. ‘‘तिच्या आनंदात आमचा आनंद आहे. पॅरिसमध्ये गेल्यावर मला हॉकी खेळाडू, अमन सेहरावत, नीरज चोप्राला भेटता आले. मला आशा आहे की हे सर्व खेळाडू अशीच पदके जिंकत राहतील आणि तेव्हा या देशातील सर्व आईंसाठी ही अभिमानाची गोष्ट असेल,’’ अशी भावना मनू भाकरची आई सुमेधा यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>Team India : BCCI ने भारताच्या वेळापत्रकात केला मोठा बदल, बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धची मालिका कधी होणार?

विश्वचषक स्पर्धेस मुकण्याची शक्यता

मनू भाकर या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात नवी दिल्ली येथे होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेस मुकण्याची शक्यता मनूचे प्रशिक्षक जसपाल राणा यांनी वर्तवली आहे. ‘‘मनूने पॅरिसमध्ये एकाच स्पर्धेत दोन पदके मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर मायदेशी परतल्यावर मनूने तीन महिने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूसाठी ही आवश्यक बाब आहे. यात वेगळे असे काहीच नाही. ती बऱ्याच काळापासून प्रशिक्षण घेत आहे. आधी प्रशिक्षण, नंतर सराव, मग स्पर्धा अशा व्यग्र कार्यक्रमात खेळाडू थकून जाणे साहजिक आहे. त्यामुळेच तिने तीन महिने विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती नवी दिल्लीतील विश्वचषक स्पर्धेत खेळू शकेल की नाही याबाबत खात्री नाही,’’ असे राणा यांनी सांगितले. ही स्पर्धा १३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे.