Manu Bhaker and D Gukesh received Khel Ratna Award 2024 : शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यामध्ये क्रीडा जगतातील काही नामवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. या दोन्ही खेळाडूंना टाळ्यांच्या कडकडाटात हा सन्मान प्रदान करण्यात आला. मनू भाकरने ऑलिम्पिकमध्ये देशाला नाव लौकिक मिळवून दिला, तर डी गुकेशने नुकतेच बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

हरमनप्रीत सिंगचाही करण्यात आला सन्मान –

याशिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगलाही देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरमनप्रीत सिंग हा भारतीय हॉकी संघाचा भाग होता, ज्याने टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्येही संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकीने मोठे यश संपादन केले. ज्यामुळे त्याला हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.

पॅरा ॲथलीट्सचांही केला गौरव –

याच समारंभात पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमारलाही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रवीण कुमारने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, जे त्यांच्या समर्पण आणि मेहनतीचे प्रतीक आहे. त्याचे जीवन संघर्षांनी भरलेले आहे. विशेषत: त्यांच्या जन्माशी संबंधित शारीरिक व्याधी असूनही त्यांनी मिळवलेले यश खूपच प्रेरणादायी आहे. यावेळी ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यापैकी १७ पॅरा ऍथलीट होते.

हेही वाचा – Harbhajan Singh : ‘सर्फराझने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी लीक केल्या असतील तर कोचने…’, हरभजन सिंगची संतप्त प्रतिक्रिया

यंदा ३२ खेळाडूंना मिळाला अर्जुन पुरस्कार –

अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावत, नेमबाज स्वप्नील कुसाळे, सरबज्योत सिंग आणि पुरुष हॉकी संघाचे सदस्य हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, संजय आणि अभिषेक यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या यशाने हे सिद्ध होते की भारतीय क्रीडा विश्वात सातत्याने सुधारणा करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. या खेळाडूंनी त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि संघर्षाने देशाचा गौरव केला आहे आणि त्यांचे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांचे फळ नाही तर भारतीय क्रीडा संस्कृतीच्या मजबूत पायाचे प्रतीक आहे.

Story img Loader