नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने क्रीडाक्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारच्या यादीत नेमबाज मनू भाकरचे नाव न दिसल्याने सुरू असलेल्या वादाला मनूनेच शांत केले. अर्ज भरताना माझ्याकडूनच चूक झाली असे स्पष्टीकरण मनूने दिले आहे.

पुरस्कार यादी निश्चित होण्यापूर्वीच मनूच्या वडिलांनी सोमवारी मनूचे नाव यादीत नसल्यामुळे सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली होती. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनूने दोन कांस्यपदके मिळवताना इतिहास रचला होता. तसेच याआधीही तिने विविध स्पर्धांत चमक दाखवली आहे. ‘इतकी उत्कृष्ट कामगिरी करूनही सर्वोत्तम पुरस्कार मिळत नसेल, तर देशासाठी कशाला खेळायचे?’ इतकी टोकाची भूमिका मनूच्या वडिलांनी घेतली होती.

हेही वाचा >>> सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! डावाच्या सुरुवातीला संयम राखण्याचा गावस्करांचा पंतला सल्ला

गेली तीन वर्षे मी मनूचा अर्ज भरत आहे, या वर्षीही भरला. परंतु काहीच उपयोग होत नाही असे मनूचे वडील म्हणाले होते. त्यांच्या टीकेनंतर क्रीडा मंत्रालयाने तातडीने पुरस्कार यादीच अजून निश्चित झालेली नाही. यासाठी एक प्रक्रिया आणि वेळ असते, ती पूर्ण होऊ द्या असे स्पष्ट केले होते.

यानंतर सुरू झालेला चर्चेचा गदारोळ थांबविण्यासाठी मनूने समाजमाध्यमाचा उपयोग करुन घेत ‘‘एक खेळाडू म्हणून माझी भूमिका देशासाठी खेळणे आणि सर्वोत्तम कामगिरी करणे हीच असते. नामांकन अर्ज भरताना माझ्याकडून चूक झाली आहे आणि त्यात सुधारणा केली जात आहे,’’ असे मनूने ‘एक्स’वर म्हटले आहे. ‘‘पुरस्कारांमुळे अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा मिळते हे खरे तरी ते माझे अंतिम ध्येय नाही. देशासाठी पदके जिंकण्यासाठीच मी खेळते,’’ असेही मनू पुढे म्हणाली.

पुरस्कार निवड समितीने हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक उंच उडी विजेता प्रवीण कुमार यांच्यासह ३० खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी नावे निश्चित केली आहेत.

Story img Loader