युवा नेमबाज मनू भाकर हिने २०२० ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळवण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. जवळपास सर्वच प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी मनू भाकर आता टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी निवडक स्पर्धाना प्राधान्य देणार आहे.

मनूने वरिष्ठ विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून सर्वाचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि यूवा ऑलिम्पिकमध्ये मनूने सुवर्णपदक पटकावत आपली छाप पाडली होती. या वर्षी मनूसह राहुल चौधरी या युवा नेमबाजांनी चमकदार कामगिरी करत नेमबाजीत भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे, हे दाखवून दिले होते. ती म्हणाली, ‘‘यावर्षी युवाशक्तीचा नजराणा पाहता आला. युवा खेळाडू प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करत असून आपली ध्येयपूर्ती करत आहेत, ही चांगली बाब म्हणावी लागेल. आता आम्ही आमचे ध्येय निश्चित केले असून त्यासाठी कठोर मेहनत घेत आहोत. युवा नेमबाज चांगली कामगिरी करत आहेत, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.’’

‘‘वरिष्ठ स्पर्धामध्येही जवळपास सर्वच खेळाडू हे कनिष्ठ गटातील आहेत. आम्हा कनिष्ठ नेमबाजांना वरिष्ठ गटाच्या स्पर्धामध्ये खेळण्याची अधिकाधिक संधी मिळत आहे. कुस्ती आणि बॉक्सिंग या खेळात मात्र तसे शक्य होत नाही,’’ असेही मनू भाकरने सांगितले. यंदाच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १३ वर्षीय ईशा सिंगने मनू आणि हिना सिधू यांसारख्या अव्वल नेमबाजांना हरवून महिलांच्या एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.

Story img Loader