कनिष्ठ गटात युवा नेमबाजांकडून विश्वविक्रमी कामगिरीची नोंद

कुवेत सिटी : नेमबाजीतील भारताचे नवे तारे मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक गटात विश्वविक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकावर नाव कोरले.

भारताच्या कनिष्ठ संघाने या चॅम्पियनशीपमध्ये ४ सुवर्णपदकांसह ११ पदकांची कमाई केली. मनू आणि सौरभ यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अगदी प्रारंभापासूनच वर्चस्व गाजवले.

त्यामुळे प्रारंभापासूनच त्यांना पदक मिळण्याबाबत शाश्वती होती. अखेरीस त्यांनी विश्वविक्रमी ४८५.४ गुणांची वसुली करीत सुवर्णपदक तर चीनच्या खेळाडूंनी ४७७.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले. चीनच्या अजून एका संघाने कांस्यपदक मिळवले. भारताच्या अभिज्ञा पाटील आणि अनमोल जैन या जोडीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या सौरभचे गत दोन दिवसांमधील हे तिसरे सुवर्णपदक ठरले. त्याआधी त्याने १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक प्रकारातही सुवर्णपदकावर ठसा उमटवला होता.

पात्रता फेरीत भारताच्या मनू आणि सौरभ यांनी पाच अव्वल संघांमध्ये द्वितीय स्थान मिळवले होते. त्यावेळी त्यांनी ८०० पैकी ७६२ गुण मिळवत त्यांच्या कामगिरीची चुणूक दाखवून दिली होती. तर अभिज्ञा आणि अनमोल हे पात्रता फेरीत तृतीय स्थानी होते. मात्र त्यांना पदक मिळवण्यात अपयश आले.