आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाजपटूंनी आपल्या धडाकेबाज कामगिरीचा धडाका सुरुच ठेवला आहे. म्यूनिच शहरात सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मनू भाकेरला १० मी. एअर पिस्तुल प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. मनूचं पदक एका स्थानानं हुकलं असलं तरीही २०१.० गुणांच्या कमाईमुळे मनूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालं आहे. पात्रता फेरीत मनूला तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं होतं.

१० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताचा हा पहिला ऑलिम्पिक कोटा ठरला आहे. त्याआधी मंगळवारी, महाराष्ट्राची तरुण नेमबाजपटू राही सरनौबतने २०२० साली जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. म्यूनिच शहरात सुरु असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत राहीने २५ मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. राहीसोबत भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरीनेही पुरुषांच्या १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.