मुंबई सेंट्रलचा मराठा मंदिर, नायर हॉस्पिटल हा परिसर तसा शांत, पण इथल्या मोठय़ा एसटी आगाराच्या पुढला परिसर मात्र गजबजलेला आणि बकालच. पलीकडचा चोर बाजार, रेड लाइट एरिया यांतील बजबजपुरी इथेही पसरलेली. जुन्या चार मजली इमारती आणि अरुंद रस्ते हे आजही येथे पाहायला मिळतात. याच रस्त्यांतून वाट काढत नागपाडा परिसरात दाखल होताच मस्तान वायएमसीएची वास्तू क्रीडारसिकांना सुखद धक्का देते. जुन्या इमारतींनी वेढलेल्या अधूनमधून टोलेजंग टॉवर डोकावत असलेल्या या विभागात खेळाचे मैदान उपलब्ध आहे, यावर कुणाचा विश्वास बसेल तर नवल. पण इतर मैदानांप्रमाणे येथे खेळाव्यतिरिक्त कार्यक्रम आटोपले जात नाहीत. येथील लोकांना बास्केटबॉल हा एकच खेळ माहीत आहे आणि तोही मस्तान वायएमसीएमुळे. बास्केटबॉलसाठी मस्तान वायएमसीएने स्वत:ला झोकून दिले आहे.
बास्केटबॉलमधील महाराष्ट्राची अधोगती यावर वेगळे भाष्य करायला नको. भारतीय संघात महाराष्ट्र वगळून अन्य विशेषत: दाक्षिणात्य राज्यांचे वर्चस्व दिसते. संघटनात्मक वादात अडकलेला हा खेळ मस्तान वायएमसीएमुळे जिवंत आहे. १० बाय १०च्या खोलीचे कार्यालय आणि त्यामसोर बास्केटबॉलची दोन कोर्ट हा मस्तान व्हायएमसीएचा संसार. पण या लहानशा कुटुंबाने मुंबईतील बास्केटबॉल जपले आहे. कुणीही या बास्केटबॉल खेळा आणि कौशल्य सिद्ध करून या खेळातील तंत्रज्ञान अवगत करा, तेही खिशाला फार कात्री न लावता. एखाद्या उदयोन्मुख खेळाडूची तीही परिस्थिती नसेल तर हा क्लब त्याचा सर्व खर्च उचलतो. येथे परदेशात खेळण्याची संधी मिळेल अशी आश्वासने दिली जात नाहीत. उत्तम बास्केटबॉलपटू कसे घडतील, या ध्यासाचा येथे पाठलाग केला जातो. वायएमसीएच्या इतिहासाची पाळेमुळे आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जातील. पण मस्तान वायएमसीएचा जन्म हा २०-२५ वर्षांनुवर्षीचा असेल, असे येथील जाणकार सांगतात.
‘‘बास्केटबॉल स्पर्धा वीसेक वर्षांपासून आम्ही घेत आहोत, पण त्यात सातत्य नव्हते. अनेक
अडचणी आल्या, त्यात आर्थिक जमवाजमव हा यक्षप्रश्न होताच. त्यातून मार्ग काढत गेली सहा वर्षे आम्ही सातत्याने स्पर्धा घेत आहोत,’’ असे मस्तान वायएमसीएचे सचिव आर. के. अमोलराज सांगतात. सुरुवातीला २० पर्यंत मर्यादित असलेली संघसंख्या सहाव्या वर्षी ८५वर गेल्याचे ते अभिमानाने सांगतात.
- प्रत्येक दिवस १३, १६, १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवरील जवळपास ३५० खेळाडूंना प्रशिक्षण
- १३ वर्षांखालील संघ संख्या सात-आठने वाढून ३० पर्यंत गेली आहे
- १३, १६, १८ वर्षांखालील मुलींच्या संघ बांधणीवर विशेष भर
- बास्केटबॉलपटूंना मोफत प्रशिक्षण, तसेच प्रशिक्षकांना उच्चस्तरीय प्रशिक्षण
- बास्केटबॉलव्यतिरिक्त वायएमसीए व्हॉलीबॉल, फुटबॉल, कॅरम, मैदानी स्पर्धाचे आयोजन
भारतातील बास्केटबॉल पंढरी म्हणून मस्तान वायएमसीए ओळखला जातो. नागपाडा बास्केटबॉल असोसिएशन आणि मस्तान वायएमसीए यांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. तेथील नजीकच्या परिसरातील गरीब कुटुंबीयांमधील मुलांना बास्केटबॉलच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मस्तान वायएमसीएने केले आहे. आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळलेले पहिले भारतीय शाहिद कुरेशी हे मस्तान वायएमसीएचे आहेत. महाराष्ट्राच्या बास्केटबॉल प्रगतीत मस्तान वायएमसीएचा सिंहाचा वाटा आहे. – कृष्णा गोविंद मुथूकुमार, सचिव, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन
महाराष्ट्रातील बास्केटबॉल स्पर्धा बऱ्याच कमी झाल्या आहेत. मस्तान वायएमसीए सातत्याने स्पर्धा घेत आहेत आणि त्याने खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. बास्केटबॉलसह खेळाडूंना योग्य शिक्षण आणि आरोग्याचे मार्गदर्शनही येथे केले जाते. – शब्बीर खान, माजी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू
मस्तान वायएमसीएची स्थापना बास्केटबॉलसाठीच करण्यात आलेली आहे. येथे दिवसा फेरी मारली, तर तुम्हाला अनेक मुले बास्केटबॉल कोर्टवर खेळताना पाहायला मिळतील. येथे आम्हाला खेळताना पाहून अनेक मुले या खेळाकडे आकर्षित झाली आहेत. सायंकाळी सात वाजल्यानंतर आमचे प्रशिक्षण वर्ग भरतात. त्यातून आम्ही उदयोन्मुख खेळाडू निवडतो आणि संघबांधणी करतो. मस्तान वायएमसीए एनबीए (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) स्तरापर्यंत पोहोचला आहे. एनबीएमधील अधिकारी येथे खेळाडूंची निवड करण्यासाठी येतात आणि मस्तान वायएमसीएचे अनेक खेळाडू आज एनबीएमध्येही खेळत आहेत. याचबरोबर अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. – आर. के. अमोलराज, सचिव, मस्तान वायएमसीए