भारताच्या सिंधू संस्कृतीने जगाला अनेक चांगल्या परंपरा दिल्या आहेत असे आपण अभिमानाने सांगत असतो. याचप्रमाणे भारताच्या पी. व्ही. सिंधूने केवळ आपल्या देशाला नव्हे, तर जागतिक स्तरावरील क्रीडा क्षेत्रात आश्वासक व जिद्दीने लढण्याची वृत्ती निर्माण केली आहे. गेल्या दीड वर्षांतील तिची कामगिरी लक्षात घेता आणखी किमान दोन वेळा ऑलिम्पिक व जागतिक पदके तिच्या नावावर आली तर आश्चर्य वाटणार नाही.

ऑल इंग्लंड स्पर्धा ही बॅडमिंटन क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत पहिला भारतीय विजेता खेळाडू होण्याचा मान प्रकाश पदुकोणने मिळवला. त्यानंतर पुन्हा दहा वर्षांनी पुल्लेला गोपीचंदने हे विजेतेपद मिळवले. या दोघांनी मिळवलेल्या यशानंतरही बॅडमिंटन क्षेत्रात अपेक्षेइतकी क्रांती घडली नव्हती. ती क्रांती सायना नेहवालच्या ऑलिम्पिक कांस्यपदकानंतर व त्या पाठोपाठ सिंधूने मिळवलेल्या ऑलिम्पिक रौप्यपदकाद्वारे घडून आली आहे. अलीकडे जिल्हा स्तरावरील स्पर्धामध्ये १५०० खेळाडूंचा सहभाग पाहावयास मिळतो, ही त्याचीच किमया आहे.

सिंधूने गतवर्षी रिओ येथे ऑलिम्पिक रौप्यपदक मिळवले. त्या वेळी तिचा अंतिम सामना सुरू असताना भारतात रात्र होती. तरीही या अंतिम सामन्याच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद लाखो लोकांनी घेतला. तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकल्यानंतर सर्वानाच हळहळ वाटली. हा सिंधूविषयी असलेल्या आपुलकीचाच प्रत्यय आहे. तसाच अनुभव यंदा जागतिक स्पर्धेतील अंतिम लढतीबाबत दिसून आला. या स्पर्धेतही तिला विजेतेपदाच्या उंबरठय़ावरून पराभव पत्करावा लागला. तेव्हा समाजमाध्यमांवरही तिच्या पराभवाविषयी टिप्पणी न होता तिचे भरभरून कौतुकच झाले. सुपर सीरिज मालिकांमधील सर्वोच्च स्पर्धा असलेल्या दुबई जागतिक मास्टर्स स्पर्धेच्या वेळी हाच अनुभव दिसून आला. ही किमया सिंधूने साधली आहे.

सिंधूने यंदा सईद मोदी चषक, कोरियन खुली स्पर्धा या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळवले. कोरियन स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याची ऐतिहासिक कामगिरी तिने केली. जागतिक क्रमवारीतील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये सध्या तिचे स्थान आहे. यंदाच्या स्पर्धामध्ये तिच्यापुढे ऑलिम्पिक विजेती कॅरोलीन मरीन, विश्वविजेती नोझोमी ओकुहारा, अकेनी यामागुची, तेई तिझुयिंग, ग्रेगोरिया मरिस्का आदी अव्वल दर्जाच्या खेळाडूंचेच आव्हान होते. बहुतेक वेळा याच खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी लढती झाल्या आहेत. एकेकाळी चीनच्या खेळाडूंची बॅडमिंटनमध्ये मक्तेदारी होती. कोणत्याही स्तरावरील लढतीत चीनचा खेळाडू प्रतिस्पर्धी असला की दुसऱ्या खेळाडूचे निम्मे अवसान लढतीपूर्वीच गळून जात असे. आता परिस्थिती बदलली आहे. चीनच्या खेळाडूंनाच अन्य देशांच्या खेळाडूंची, विशेषत: सिंधू व सायनाबाबत, काळजी वाटू लागली आहे.जागतिक स्तरावर मक्तेदारी गाजवण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता सिंधूकडे आहे. जवळजवळ सहा फूट उंची तिला लाभली असल्यामुळे बॅडमिंटनच्या मैदानावर चतुरस्र खेळ ती करू शकते. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी खेळाडूंनी टाकलेल्या खोलवर सव्‍‌र्हिस, ड्रॉपशॉट्स, परतीचे फटके सहजपणे परतवण्यात तिला अडचण येत नाही. यंदा तिने आतापर्यंत वैयक्तिक स्पर्धामध्ये ५० सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यांपैकी ४० सामन्यांमध्ये तिने विजय मिळवला. ज्या स्पर्धामध्ये तिचे विजेतेपद हुकले, त्या स्पर्धामध्येही तिला विजयाच्या उंबरठय़ावरूनच हार मानावी लागली आहे. बहुतेक तिच्या अंतिम लढती चाहत्यांचा श्वास रोखून धरणाऱ्या व हृदयाचे ठोके चुकविणाऱ्या झाल्या आहेत. तिच्या या सर्वच सामन्यांनी चाहत्यांना खेळाचा निखळ आनंद मिळवून दिला आहे.

सिंधू ही जेमतेम २२ वर्षांची आहे. हे लक्षात घेता आणखी किमान सहा वर्षे समर्थपणे आपली कारकीर्द घडवू शकते. किमान दोन ऑलिम्पिकमध्ये व जागतिक अिजक्यपद स्पर्धामध्ये भाग घेण्याची तिला संधी आहे. त्यामुळेच आणखी किमान दोन ऑलिम्पिक पदके व जागतिक स्तरावरील अनेक विजेतेपदे ती मिळवू शकते. आपली सहकारी खेळाडू जागतिक स्तरावर सर्वोत्तम यश मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असताना भारताच्या पुरुष खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली नाही तर नवलच. किदम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणोय, पारुपल्ली कश्यप आदी खेळाडूंनीही तिच्याकडून स्फूर्ती घेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळवले आहे. केवळ भारताच्या नव्हे तर परदेशातील अनेक नवोदित खेळाडूंनाही तिच्याकडून प्रेरणा मिळत आहे. हीच खरी भारतीय बॅडमिंटन क्षेत्राने दिलेली ‘सिंधू’ संस्कृतीची देणगी आहे.

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com