अमोल मुझुमदारने सांगितलेला एक किस्सा अजूनही स्मरणात आहे. काही वर्षांपूर्वीची गोष्ट त्याने सांगितली. तेव्हा मुंबईचा संघ रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. वानखेडेवर सामना होणार होता. सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधाराने एक बैठक बोलावली. साधारण तासभर कर्णधाराने आपलं मत व्यक्त केलं; पण हा एक तास खेळाडूंसाठी मंत्रमुग्ध करणारा होता. या तासाभराच्या संमोहनात त्या कर्णधाराने असं काही प्रेरणादायी भाषण केलं, की खेळाडू म्हणायला लागले की, आत्ताच्या आत्ता मैदानात उतरू या आणि प्रतिस्पध्र्याना चीतपट करू या; पण ते शक्य नव्हतं. कारण तेव्हा रात्र झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईचा संघ मैदानात उतरला आणि जेतेपदाला गवसणी घातली. खरं तर ते खेळाडू म्हणून काही महान वगैरे नव्हते; पण अथक मेहनत घ्यायची तयारी होती, जिद्द, चिकाटी होती, चतुरपणा होता आणि कोणत्या परिस्थितीत काय करायला हवे, याची उत्तम जाण होती. मुंबईच्या खेळाडूंना विचाराल तर सर्वोत्तम कर्णधार म्हणून त्यांचंच नाव बरीच जण सांगतील. हा एक दिवस मोठय़ा पदावर जाणार अशी काहींनी त्याच्याकडे पाहून भाकितं केली होती, ते करणं फारस कठीणही नव्हतं आणि ते पुन्हा एकदा एका मोठय़ा पदावर विराजमान झाले, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून. रवी शास्त्री हे त्यांचं नाव.
‘ऑडी’ जिंकणारा क्रिकेटपटू, अशी त्यांची ओळख साऱ्यांनाच परिचित. एका स्थानिक सामन्यामध्ये सहा षटकारांचा विक्रमही त्यांनी आपल्या नावावर केला. त्याचबरोबर काही प्रेमप्रकरणांमध्येही त्यांचं नाव चर्चेत होतं. उपयुक्त फलंदाजी आणि डावखुरी गोलंदाजी, हेच त्यांचे वैभव; पण त्यापेक्षाही फार जास्त गुण-अवगुण त्यांच्या अंगी होते. समालोचक म्हणून त्यांची ख्याती क्रिकेटविश्वात पसरलेली होती; पण एखादी गोष्ट मिळाली नाही की ती काहीही करून मिळवण्याची विजिगीषू वृत्ती ठासून भरलेली. या वेळी प्रशिक्षकपदाच्या निवडीच्या वेळी ते दिसून आलेच. २००७ साली ते संघाबरोबर बांगलादेशला व्यवस्थापक म्हणून गेले. २०१४ साली ऑगस्ट महिन्यात भारताचा संघ अडचणीत सापडला असताना त्यांची नेमणूक संचालकपदी झाली. संघाच्या प्रशिक्षकाच्यावर त्यांची जागा नेमली गेली. कारण या अडथळ्यांच्या शर्यतीतून ते बाहेर काढणार, हा विश्वास बीसीसीआयला होता. त्यांनी ते करूनही दाखवलं. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत नजरेला नजर भिडवणारा संघ त्यांनी तयार केला.
महेंद्रसिंग धोनी तसा शांत, तर कोहली आक्रमक. धोनीपेक्षा कोहली त्यांना अधिक पसंत पडला. परिस्थिती अशी अनुरूप तयार झाली की, कोहली कर्णधारपदाच्या बोहल्यावर चढला. कोहलीशी त्यांची एवढी घट्ट मैत्री झाली की, त्याला शास्त्रींवाचून करमत नव्हतं. तशी जादू करण्याची त्यांची खासियतच. २०१५ चा विश्वचषक आठवून बघा. स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या पदरी मानहानीकारक पराभव पडले होते. भारतीय संघाचा या स्पर्धेत निभाव लागणार नाही, असं सारेच बोलत होते; पण शास्त्रींनी संघाला कोणता डोस पाजला कुणास ठाऊक. फॉर्मात नसलेले खेळाडू ऐन भरात आले आणि भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत सहज पोहोचला.
वर्षभरापूर्वीपर्यंत संघाला त्याचा सहवास होता; पण गेल्या वेळी एका क्षुल्लक कारणावरून त्यांचा अर्ज प्रशिक्षकपदासाठी नाकारण्यात आला. तेच त्यांना झोबलं. ज्यांनी आपल्याला नाकारलं तेच आपल्याला पायघडय़ा घालून बोलवतील, असं मनाशी नक्की केलं. वर्षभर ते संघापासून दिसायला लांब होते, पण शांत नव्हते. संघ शांत दिसत असला तरी तसा तो कुठे होता. वादळं येतच होती. त्सुनामी कधी आणायचं हे ठरलेलंच होतं बहुधा. तसंच झालं. प्रशिक्षकाचा वर्षभराचा कार्यकाळ संपत आला असताना मानापमान नाटय़ घडलं की घडवून आणलं, हे सुज्ञांना सांगणं न बरे. संघापासून लांब असतानाही त्यांची खेळाडूंवर मोहिनी कायम होती. कोहली तर त्यांच्या नावाचा जपच करत होता. त्यापुढे अखेर सल्लागार समितीला झुकावं लागलं. हे सारं पडद्यावर घडत असताना त्यामागचा सूत्रधार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. मुख्य प्रशिक्षकपद मिळाल्यावर आपल्यावर पाहणी ठेवायला कुणाला आणलं गेलंय, हे त्यांना समजलं आणि आपल्या खास मार्गाने विरोध केला. आपल्याला हव्या असणाऱ्या माणसांसाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं.
शास्त्री आणि सध्याचे खेळाडू यांच्यामध्ये वयाचं अंतर जास्त असलं तरी ते त्यांना आपलेसे वाटतात. का? कारण मैदानावर ते मार्गदर्शक आणि मैदानाबाहेर ते मित्र होतात. खेळाडू व्यावसायिक झाले. परदेशातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी शिकल्या, तशी संस्कृतीही आत्मसात केली. शास्त्री या संस्कृतीत चपखल बसलेले होतेच. तीच त्यांनी संघात अवलंबली. एखादी गोष्ट खटकली की ती स्पष्टपणे आपल्या खास शैलीत बोलण्यात शास्त्री कधीही कचरले नाहीत. वानखेडेवरचा त्यांचा आणि सुधीर नाईक यांचा किस्सा आठवत असेलंच. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या बाबतीत घडल्या आहेत. मुंबईचा खडूसपणा त्यांच्या रक्तात आहेच. तो त्यांनी खेळाडूंमध्येही भिनवला आहे. आता पुढील दोन वर्षांत तो अजून भिनेलही; पण खडूसपणा आणि बेमुर्वतखोरपणा यांच्यातला फरक शास्त्री सरांनी खेळाडूंना सांगायला हवा. नाही तर आक्रमकतेला क्षणभंगुरतेची किनार असते, हे विसरून चालणार नाही.
प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com