अर्जुन पुरस्कारासाठी नवी दिल्ली येथे जाऊन सौदेबाजी करावी लागते, असे धाडसी विधान ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व प्रशिक्षक उदय पवार यांनी एका जाहीर समारंभात केले होते. पवार ही काही सामान्य व्यक्ती नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत शेकडो खेळाडू तयार झाले आहेत आणि होत आहेत. त्यामुळेच त्यांच्या या विधानाची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे.

क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, मार्गदर्शक, संघटक आदी विविध व्यक्तींच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी केंद्र शासनातर्फे मेजर ध्यानचंद, द्रोणाचार्य, अर्जुन आदी विविध पुरस्कार दिले जात असतात. तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीसाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो. दुर्दैवाने दरवर्षी पुरस्कार विजेत्यांच्या नावाबद्दल व पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेवरून नेहमीच चौफेर टीका होत असते. या पुरस्कारांसाठी वर्षांनुवर्षे नियमावलीत बदल झालेला नसतो किंवा समजा काही बदल केलेच तर त्याची अंमलबजावणी लगेच होत नाही आणि सर्वसामान्य खेळाडूंपर्यंत ती पोहोचलेली नसते.

पुरस्कार विजेत्यांची नावे निश्चित करण्यासाठी स्वतंत्र निवड समिती नियुक्त केलेली असते. त्या समितीमध्ये अनेक ज्येष्ठ खेळाडू, क्रीडा संघटक व प्रशिक्षकांचा समावेश असतो. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्र्यांसह या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यामध्ये स्थान असते. ज्या खेळाडूंनी जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेली असते असे खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक राष्ट्रीय पुरस्कारांसाठी पात्र असतात. खरंतर अशा खेळाडूंची माहिती संबंधित खेळाच्या राष्ट्रीय संघटनांना माहीत असणे अपेक्षित असते. बहुंताश हे खेळाडू केंद्र शासनाची परवानगी घेऊनच परदेशात जात असतात. त्याचप्रमाणे अशा खेळाडूंच्या कामगिरीचे सर्वच प्रकारच्या प्रसार माध्यमांकडून कौतुक केले जात असते. साहजिकच दररोज अनेक वृत्तपत्रांचा गठ्ठा माहिती व जनसंपर्क कार्यालयात पडत असतो. हे लक्षात घेतल्यास भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची नोंद त्यांच्याकडे होणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने पुरस्कारांसाठी खेळाडू, प्रशिक्षक, संघटक यांनी शासनाकडे अर्ज अनिवार्य असतो. या अर्जासोबत अनेक कागदपत्रे जोडावी लागतात. त्याची पूर्तता करताना सर्वाचीच त्रेधातिरपीट उडत असते. एक वेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविणे सोपे आहे, मात्र हा अर्ज करणे अवघड आहे अशीच खेळाडूंकडून प्रतिक्रिया उमटलेली असते.

टेनिसमध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. फ्रेंच खुल्या स्पर्धेतील मिश्र दुहेरीत विजेतेपद मिळवूनही रोहन बोपण्णा हा अर्जुन पुरस्कारासाठी पात्र ठरला नाही. कारण पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची मुदत एप्रिलमध्ये संपली व त्याने जूनमध्ये फ्रेंच खुल्या स्पध्रेचे विजेतेपद मिळवले. खरतर ऑलिम्पिक पदक विजेत्यांना जसा थेट राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो, त्याप्रमाणे बोपण्णालाही तसा पुरस्कार दिला गेला असता.

ऑलिम्पिक खेळांसाठीच सहसा राष्ट्रीय पुरस्कार दिले जात असतात. अर्थात ऑलिम्पिक क्रीडा प्रकार नसतानाही आजपर्यंत अनेक क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार मिळालेले आहेत. त्यातील काही क्रिकेटपटूंना या पुरस्काराविषयी फारसे महत्त्व वाटतही नसते. मध्यंतरी महेंद्रसिंह धोनी व हरभजनसिंग यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार वितरण समारंभ दिल्लीत होत असताना हे दोन्ही खेळाडू भारतात असूनही व त्या वेळी कोणतेही महत्त्वाचे सामने सुरू नसतानाही समारंभास उपस्थित राहिले नव्हते. क्रिकेटपटूंना नियमित हा पुरस्कार दिला जातो, तर खो-खो या देशी खेळालाही त्यामध्ये स्थान मिळाले पाहिजे. गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये एकाही खो-खोपटूला हा सन्मान मिळालेला नाही. या खेळाचे जरी आंतरराष्ट्रीय सामने होत नसले तरीही देशी खेळाला उत्तेजन देण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे.

तेनसिंग नोर्गे यांचे नाव ऐकले की माउंट एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखरावर पहिली चढाई करणाऱ्या गिर्यारोहकाचे चित्र डोळय़ांसमोर येते. साहसी खेळांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्यांना त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. सहसा एव्हरेस्ट किंवा तत्सम शिखरांवर चढाई करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्याची अपेक्षा आहे, मात्र अलीकडे सागरी जलतरण मोहिमा करणाऱ्यांनाही हा पुरस्कार दिला जात आहे. सहसा ज्या खेळाडूंना एरवी स्पर्धात्मक जलतरणामध्ये सर्वोत्तम यश मिळत नाही असे खेळाडू सागरी जलतरणाकडे वळत असतात असे सांगितले जाते. सागरी जलतरण मोहिमाही आव्हानात्मक असतात. मात्र जर खरोखरीच या खेळाडूंमध्ये पोहण्याचे कौशल्य आहे, तर त्यांनी आठशे किंवा पंधराशे मीटर शर्यतींमध्ये भाग घेत ऑलिम्पिक पदक मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्या प्रमाणे आजकाल विविध शिखरांच्या मोहिमांच्या यशस्वीतेबद्दल शंका निर्माण होत असते, त्याचप्रमाणे अशा सागरी मोहिमांच्या यशस्वीतेबद्दलही साशंकता निर्माण होते. स्पर्धामध्ये पदक मिळविल्याचा ढळढळीत पुरावा असतो. मोहिमांबाबत अलीकडे मोठय़ा प्रमाणावर सौदेबाजी करीत पुरावा दिला जाण्याचे प्रकार वाढले आहेत.

खेलरत्न पुरस्काराबाबत मध्यंतरी एका आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल प्रशिक्षकाने असे विधान केले, की महाभारतामधील अर्जुन मोठा की राजीव गांधी मोठे. खेलरत्न पुरस्कारास गांधी यांचे नाव देऊन अर्जुनाची प्रतिष्ठा कमी केली गेली आहे. त्यांचे विधान निश्चितच विचार करण्यासारखे आहे. क्रीडा पुरस्कारांच्या नावाकरिता राजकीय नेत्यांच्या नावाशी गल्लत करू नये अशीच अनेकांची अपेक्षा असते. एकूणच पुरस्कारांची नियमावली, त्यासाठी अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रिया याबाबत पुनर्विचार होण्याची आवश्यकता आहे. टीकेची परिसीमा गाठली जाणार नाही याची काळजी शासनाने व निवड समितीने घेतली पाहिजे तरच क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववान लोकांना त्याचा अभिमान वाटेल.

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com

Story img Loader