Ashish Sakharkar Passes Away: मराठमोळा शरीर सौष्ठवपटू आशिष साखरकरचं निधन झालं आहे. आशिष साखरकर हे शरीर सौष्ठव क्षेत्रातलं मोठं ननाव आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री अशा अनेक खिताबांवर आशिष साखरकरने नाव कोरलं आहे. काही दिवसांपासून आशिष साखरकर आजाराशी झुंज देत होता. आज अखेर आशिष साखरकरची प्राणज्योत मालवली आहे. आशिष साखरकरच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आशिष साखरकरने चारवेळा मिस्टर इंडियाचा खिताब मिळवला आहे. देश-विदेशात आपल्या कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचा तुरा खोवणारा हा सौष्ठवपटू आयुष्याची लढाई मात्र हरला आहे. आशिष साखरकर चारवेळा मिस्टर इंडिया, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य पदक, आशिया रौप्य पदक, युरोपियन चॅम्पियनशिप, शिवछत्रपती पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांवर आणि सन्मानांवर आशिष साखरकरने त्याचं नाव कोरलं होतं.
आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं आहे?
शरीर सौष्ठव स्पर्धेत मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स सारख्या अनेक खिताबांवर नाव कोरत आपला दबदबा कायम ठेवणाऱ्या मराठमोळ्या आशिष साखरकर ह्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली.
आशिषच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टवर त्याच्या असंख्य चाहते आणि मित्रांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आशिष साखरकर हा गेल्या काही दिवसांपासून एका आजाराशी झुंज देत होता. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर अनेकजण व्यक्त होत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वाहिली आदरांजली
महाराष्ट्र श्री, चार वेळा मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स अशा अनेक नामांकित किताबांवर आपली मोहोर उमटवणारे आशिष साखरकर यांचे दुःखद निधन झाले आहे. बॉडीबिल्डिंग विश्वातील मान्यवर असलेल्या आशिष साखरकर यांच्या निधनाने मन हेलावून गेले आहे. त्यांच्या जाण्याने बॉडी बिल्डिंग क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले आहे.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच साखरकर परिवारातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली आहे.